
गरब्याचा पास खरेदी करा अन् शेतकऱ्यांना मदत करा! लोटस नवरात्रोत्सवाची अनोखी मोहीम
Lotus Navratri Festival: मिरा-भाईंदर मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरा-भाईंदर शहरात बहुप्रतिक्षित आणि सुप्रसिद्ध लोटस नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक मदतीचा हात पुढे करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. Buy A Pass, Be A Donor’ अर्थात ‘गरब्याचा पास खरेदी करा आणि दानशूर व्हा’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी निधी उभारण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना मनोरंजनासोबतच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. गरब्याचा पास खरेदी करणाऱ्या नागरिकांचा सहभाग हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी उपयोगी ठरणार आहे.
या उपक्रमाची माहिती देताना भाजपचे गटप्रमुख हसमुख गेहलोत यांनी सांगितले की, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदाच्या लोटस नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक योगदानाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘Buy A Pass, Be A Donor’ या मोहिमेअंतर्गत तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतचा निधी शेतकऱ्यांसाठी उभारण्याचा मानस असल्याचे गेहलोत यांनी सांगितले. मिरा-भाईंदरमधील नागरिक, गरबा रसिक, व्यापारी, उद्योजक तसेच सामाजिक संस्थांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव नसून समाजीक एकोपा, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे गरब्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम मिरा-भाईंदरमध्ये एक नवा सामाजिक संदेश देणारा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘पास खरेदी करा, गरबा खेळा आणि शेतकऱ्यांच्या मदतीत आपला खारीचा वाटा उचला’, असा संदेश या मोहिमेतून देण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या लोटस नवरात्रोत्सवाला मिरा-भाईंदरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो का आणि ५० लाख रुपयांचे निधी संकलनाचे उद्दिष्ट कितपत साध्य होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.