MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; थेट अवर सचिवालाच केली अटक (संग्रहित फोटो)
मुंबई : देशासह महाराष्ट्रात पेपरफुटीची प्रकरणे सातत्याने समोर येत असताना आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगालाही पेपरफुटीच्या प्रकरणाने मोठा धक्का बसला आहे. अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच अटक झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी यापूर्वी एमपीएससीचे दोन सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि कथित सूत्रधार अमृत पाटील यांना अटक झाली आहे.
या प्रकरणात प्रेमप्रकरणाचा अँगलही समोर आला आहे. प्रेमसंबंधातून औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याचा दावा केला जात असला, तरी तपास यंत्रणांकडून या प्रकरणामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता तपासली जात आहे. आमदार रोहित पवार यांनी हा पेपर तब्बल ४० लाख रुपयांना विकल्याचा आरोप केला आहे.
22 मार्चला झाली होती परीक्षा
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी एमपीएससीमार्फत भरती मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला. त्यानंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी ४८८ जणांच्या मुलाखती १ ते २२ जुलैदरम्यान घेण्यात आल्या. त्यानंतर ४८५ पात्र आणि तीन अपात्र उमेदवारांची अशी एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली.
उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही
MPSC आता ड्रग इन्स्पेक्टर पदांसाठी नवीन स्क्रीनिंग परीक्षा घेणार आहे. आधीच अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्याकडून अतिरिक्त परीक्षा शुल्कही आकारले जाणार नाही. नव्या परीक्षेची तारीख आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.






