
चालकांना मराठी ज्ञान अनिवार्य, अन्यथा...; १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांचा मराठी संवाद पाठ्यक्रमात सहभाग
मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील एकूण ९ लाख ७८ हजार ५४१ वैध परवाने आहेत. यामध्ये ९ लाख १६ हजार ८८४ ऑटोरिक्षा आणि ६१ हजार ६५७ टॅक्सी परवान्यांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातच सुमारे ४ लाख ६२ हजार ३८७ रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक आहेत.
व्यावसायिक वाहनचालक दररोज हजारो प्रवाशांशी थेट संवाद साधत असतो. त्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यासाठी चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अनेक अमराठी चालकांना मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
परिवहन विभागाच्या पुढाकाराने गेल्या साडेतीन महिन्यांपासून राबविण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद पाठ्यक्रम’ अभियानाला चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी या अभियानात सहभाग नोंदवून मराठी भाषा शिकण्याची तयारी दर्शविली आहे. या उपक्रमामुळे अनेक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. मात्र, या अभियानात सहभागी न झालेल्या अथवा अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसलेल्या चालकांपर्यंतही पोहोचणे आवश्यक आहे.
परिवहन विभागाच्या पुढाकाराने मराठी भाषा शिकू इच्छिणाऱ्या चालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या वर्गांचा नुकताच समारोप झाला. समारोपप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शासनाचा मराठी भाषा विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन आवश्यक आर्थिक तरतूद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. दरम्यान, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातूनही या अभियानाला सर्वतोपरी सहकार्य केले जाणार असल्याचे ज्येष्ठ कवी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यात ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संवर्गातील ९ लाख ७८ हजारांहून अधिक वैध परवाने आहेत. त्यापैकी १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी या अभियानात सहभाग नोंदविला आहे. उर्वरित अनेक चालकांना अद्याप व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नाही. अशा चालकांनी मराठी भाषा शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांना यापुढेही मराठी भाषा विभागाकडून सहकार्य केले जाणार आहे. परिवहन विभागाच्या वतीने १०५ दिवस राबविण्यात आलेले ‘मराठी शिका’ अभियान संपले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुढे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना परिवहन विभागाचे पूर्ण सहकार्य राहील, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
नवीन नियमावलीनुसार व्यवहारिक मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. परिवहन विभागाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून १०५ दिवस ‘मराठी शिका’ हे अभियान राबविले. मात्र, आता कारवाईच्या कक्षेत येणाऱ्या उर्वरित अमराठी चालकांच्या बाबतीत नियमांची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने करावी, याबाबत उद्याच्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.