
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका
कल्याण डोंबिवलीतील त्या ६५ इमारतींबाबत नगर विकास विभागाची बैठक
हिवांशाना दिलासा देणारा तोडगा काढण्याचे खासदार डॉ. शिंदेंचे निर्देश
मुंबई: मुंबई महापालिकेत सत्तेत असताना मराठी माणसासाठी काही केलं नाही. हक्काच्या घरापासून वंचित राहिलेला मराठी माणसाने संक्रमण शिबीरातच १० ते १५ वर्ष काढली. त्याला घर देण्याचा विचार केला नाही आणि आता निवडणुकीसाठी मराठी माणसाबाबत राजकारण करत आहेत, अशी खरमरित टीका शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठा, मनसेवर केली. मंत्रायलात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव व अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या दालनात कल्याण डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींबाबत आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे माध्यमांशी बोलत होते.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५ इमारती अनधिकृत घोषीत करण्यात आल्या आहेत. यातील रहिवाशांची विकासकांकडून फसवणूक झाली आहे. न्यायालयाने या इमारती निष्कासीत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हजारो कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आज खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, अनधिकृत बांधकाम प्रकरणातील रहिवाशांना न्यायालायीन निर्णयाच्या अधीन राहून कशा पद्धतीने दिलासा देता येईल, याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. या रहिवाशांनी हाउसिंग सोसायटी स्थापन करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे यातील जमिनीचा मालकी हक्क हा स्थानिक रहिवाशांना मिळणे सोपा होईल.
मात्र यातील नोंदणी होणे, सातबाऱ्यावर त्यांचे नाव घेणे, याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे ते म्हणाले. यातील निम्म्याहून अधिक इमारतीची नोंदणीची प्रक्रिया ही जलदगतीने सुरू होण्यासारखी आहे. यामुळे प्राधान्याने किमान या इमारतींची नोंदणी प्रक्रिया जलदगतीने राबवावी, विकासकांवरील कारवाईची प्रक्रिया देखील जलदगतीने राबविण्यात यावी अशा सूचना देखील यावेळी दिल्या.
याबाबत राज्याचा नगरविकास विभाग, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि कल्याण डोंबिवली महापालिका या एकत्रित पद्धतीने प्रस्ताव तयार करुन तो पुढील मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. या बैठकीला आमदार राजेश मोरे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह शिवसेनेचे विश्वनाथ राणे, नितीन पाटील, रवी पाटील, रवी म्हात्रे, राजन मराठे, गुलाब वझे, पंढरीनाथ पाटील, सागर जेधे उपस्थित होते.
मराठी माणसावरुन राजकारण करणाऱ्यांवर खासदार डॉ. शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले की, मराठी माणसाला हक्काचे घर देण्याचे काम महायुती सरकारने केली असून तो महायुतीच्या मागे खंबीर उभा आहे. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने ते निवडणूक आयोगावर खापर फोडत आहेत, असा टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला.