Mumbai Youth Festival : मुंबईत 25 नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव; युवक-युवतींना कलागुण दाखवण्याची संधी, सौजन्य : चॅट जीटीपी
Mumbai Youth Festival : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन, युवकांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026-27 चे आयोजन 25 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे.
हा महोत्सव मारवाडी कमर्शियल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, चर्नी रोड, मुंबई येथे होणार आहे. या महोत्सवात मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या युवा महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. समूह लोकनृत्य व समूह लोकगीत वगळता इतर स्पर्धांसाठी नशामुक्त युवा, विकसित भारत ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. स्पर्धकांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत सादरीकरण करता येणार असून, सर्व सादरीकरणे मौलिक व स्वनिर्मित असणे आवश्यक आहे.
17 ऑगस्ट 2026 रोजी वयाची 15 ते 29 वर्षे पूर्ण केलेले युवक-युवती या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास पात्र असतील. स्पर्धक मुंबई शहर-जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा मुंबई शहर-जिल्ह्यात शिक्षण घेत असावा. वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला सादर करणे आवश्यक आहे. एका स्पर्धकाला केवळ एका स्पर्धा प्रकारात सहभागी होता येईल.
मागील वर्षीच्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत सहभागी झालेल्या युवकांना यंदाच्या महोत्सवात सहभागी होता येणार नाही. स्पर्धांचे सविस्तर नियम व अटी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून जाणून घेता येतील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना रायगड येथे आयोजित विभागीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुक युवक-युवतींनी 23 नोव्हेंबर 2026 पर्यंत दिलेल्या Google Form लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करावी. मुंबई शहरातील महाविद्यालये, विद्यालये आणि युवक मंडळांनी अधिकाधिक युवक-युवतींना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मुंबई शहर क्रीडा अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Ans: हा महोत्सव 25 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
Ans: चर्नी रोड येथील मारवाडी कमर्शियल स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात हा महोत्सव होणार आहे.
Ans: समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.






