भुरट्या पत्रकाराचा मुखवटा उतरला! शैलेंद्र द्विवेदी लोणावळ्यातून जेरबंद; उलवे पोलिसांची कारवाई
पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२, बेलापूर अंतर्गत उलवे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात शैलेंद्र द्विवेदी हा आरोपी होता. आरोपीने आपल्या फर्मच्या माध्यमातून कमी पैशांत घर देण्याचे आमिष दाखवून तक्रारदार विजय झा यांची १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तांत्रिक तपासाच्या मदतीने १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०४ वाजता लोणावळा येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली.
दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार, पाठलाग करत तरुणावर कोयत्याने वार; आळंदीतील घटनेनं खळबळ
विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, शस्त्र बाळगणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण यांसह विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर करून पोलीस दलाची बदनामी करणे आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचाही उल्लेख प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर नवी मुंबईतील पत्रकारितेच्या नावाखाली वावरणाऱ्या भुरट्या पत्रकारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पत्रकारितेचा आधार घेत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी जवळीक निर्माण करणे, त्याचा गैरवापर करणे, नागरिकांवर दबाव निर्माण करणे आणि सोशल मीडियावरून वेगवेगळे आरोप करणे, अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
मात्र, केवळ अशा व्यक्तींवर कारवाई करून चालणार नाही. त्यांना पोलीस विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी मदत करत असतील, त्यांच्याशी गोपनीय माहितीची देवाणघेवाण करत असतील किंवा त्यांच्या गैरप्रकारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतील, तर अशा व्यक्तींचीही चौकशी होणे आवश्यक आहे. उलवे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीच्या अटकेची माहिती दिली, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, येणाऱ्या काळात पोलीस विभागातील अशा भुरट्या पत्रकारांना मदत करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावेही समोर आणली जाणार का, हा खरा प्रश्न आहे.
ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे तसेच पनवेल पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही पत्रकारितेच्या नावाखाली वावरणाऱ्या काही संशयास्पद व्यक्तींच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा होत असते. अशा व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची, त्यांच्या पत्रकारितेच्या ओळखीची आणि पोलीस विभागातील संपर्कांची सखोल चौकशी होणार का? त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत, हेही पोलीस प्रशासन तपासणार का?
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अशा सर्व संशयास्पद व्यक्तींना रडारवर घेऊन निष्पक्ष चौकशी करणार का, याकडे आता नागरिकांसह खऱ्या पत्रकारितेची बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारांचे लक्ष लागले आहे. कारण पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार करणाऱ्यांमुळे प्रामाणिक पत्रकारितेची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच त्यांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणे गरजेचे आहे.
पोलिसांकडूनच जीवाला धोका! तरुणाचा गंभीर आरोप; थेट आयुक्तांकडे केली तक्रार






