मुंबईकरांना दिलासा! पालिका रुग्णालयांत लवकरच सुरू होणार MRI सेवा, आरोग्य व्यवस्थेला मिळणार मोठी ताकद
महापालिकेच्या केईएम, नायर, कूपर आणि सायन या चार महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक एमआरआय सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना खासगी केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणार असून, कमी खर्चात आणि वेळेत निदान होण्यास मदत होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एमआरआय ही अत्यंत महत्त्वाची निदान चाचणी असून मेंदू, मणका, स्नायू तसेच अंतर्गत अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र, आतापर्यंत पालिका रुग्णालयांमध्ये ही सुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. एमआरआय सेवेसाठी मागील काही वर्षापासून सातत्याने मागणी होत होती. विधिमंडळाच्या अधिवेशनातही या मुद्द्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रक्रियेला गती देत टेंडर पूर्ण करून आता प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.
रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या एमआरआय सेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून वर्क ऑर्डरही जारी करण्यात आल्या आहेत. ही सेवा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना कमी खर्चात आणि जलदगतीने निदानाची सुविधा मिळेल. तसेच रुग्णालयांवरील ताण कमी होऊन आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल. – डॉ. शैलेश मोहिते, संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये






