'लीलावती'त 1200 कोटींचा घोटाळा, संचालकांच्या आरोपाने खळबळ
मुंबईतल्या जगप्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमध्ये तब्बल 1200 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप हॉस्पिटलचे संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे. त्यांनी हॉस्पिटलच्या माजी विश्वस्तांनीच ही अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लीलावती हे मुंबईतील प्रतिष्ठित हॉस्पिटल आहे. बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची हे हॉस्पिटल पहिली पसंती असते. सैफ अली खानवर काही दिवसांपूर्वी चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी त्याला तिथंच दाखल करण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांनाही यापूर्वी उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या प्रकरणात वांद्रे पोलिसांसह अंमलबजावणी संचालनालय (ED) कडे देखील तक्रार केली आहे. निधीच्या अभावामुळे दररोज हॉस्पिटलमधील हजारो रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होत आहे, अशी तक्रार या ट्रस्टनं केली आहे. या अफरातफरीला जबाबदार असलेले ट्रस्टी हे सध्या दुबई आणि बेल्जियममध्ये आहेत, अशी माहिती मुंबईचे माजी पोलीस संचालक आणि लीलावती हॉस्पिटलचे सध्याचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी केला आहे. एका डीजिटल वृत्तवाहिनीने याबात वृत्त दिलं आहे.
या ट्रस्टच्या ऑडिट दरम्यान हा सर्व प्रकार लक्षात आला. फॉरेन्सिक ऑडिटनंतर, ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात अनियमितता, आर्थिक फसवणूक आणि निधीचा गैरवापर केल्याचे लेखापरीक्षकांनी उघड केले. या प्रकरणाचा काही काळ तपास सुरु होता. त्यानंतर ट्रस्टने आता औपचारिकपणे अंमलबजावणी संचालनालय किंवा ईडीकडे तक्रार दाखल केली आहे.
हा वैद्यकीय क्षेत्रातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. वैद्यकीय क्षेत्रात इतका मोठा घोटाळा कुणीही केलेला नाही, असा दावा ट्रस्टचे विद्यमान संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे. या प्रकरणात 7 मार्च रोजी एफआयर नोंदवण्यात आली आहे. त्यामध्ये माजी विश्वस्त आणि इतर आरोपी व्यक्तींचा समावेश असलेल्या तपासाबाबत नवीन तपशील देण्यात आला आहे.
लीलावती हॉस्पिटलची स्थापना ही 1978 साली किशोर मेहता यांनी केले होते. त्यांनी 2002 साली तब्येत बरी नसल्यानं हा सर्व कारभार त्यांचे भाऊ विजय मेहता यांना सोपवला. विजय यांनी किशोर मेहता यांनाच ट्रस्टमधून बाहेर काढले. त्यानंतर किशोर मेहता यांनी मोठा संघर्ष करुन हा चार्ज हाती घेतला आणि त्यांचा मुलगा आणि पत्नीकडे सर्व चार्ज सोपवला. विद्यमान संचालक प्रशांत मेहता हे विजय मेहता यांचे चिरंजीव आहेत. किशोर मेहता ट्रस्टच्या बाहेर असताना हा सर्व घोटाळा झाल्याचा प्रशांत मेहता यांचा आरोप आहे.
गुजरातमधील भागलपूरमध्ये या ट्रस्टचे लहान हॉस्पिटल आहे. प्रशांत मेहता यांच्या आजीनं भविष्यात नवीन हॉस्पिटलच्या उभारणीसाठी सोनं, चांदी आणि हिरे लॉकरमध्ये ठेवले होते. पण, ट्रस्टींने ते दागिने देखील पळवून नेले असून त्यांची बाजारातील किंमत 44 कोटी आहे, असा आरोप प्रशांत मेहता यांनी केला आहे.