सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत
तुळजापूर : धाराशिव शहरात सख्ख्या भावानच बहिणीची फसवणूक करून वारसाहक्कातील मालमत्ता बेकायदेशीररीत्या हस्तगत केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी भावासह बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साधना सुरेश देशमुख या फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीत, आपल्या वडिलोपार्जित शेतजमीन व घरजागेवरील हक्क डावलून सख्खा भाऊ सतीश सोपानराव पाटील, त्याचा मुलगा आनंद पाटील व त्यांचे वडील आणि अन्य १२ आरोपींनी संगनमत करून खोट्या सहा मारून बनावट खरेदीखते तयार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात साधना देशमुख यांनी पोलिस तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी योग्य कारवाई न केल्याने त्यांनी अॅड. विशाल प्रभाकर साखरे यांच्या मार्फत मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गीते यांच्या न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. सदरील सुनावणीत अॅड. विशाल साखरे यांनी मांडलेल्या ठोस युक्तिवादानुसार आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी साधना देशमुख यांच्या वारसाहक्कातील शेतजमीन व घरजागा खोट्या व बनावट सह्या करून बेकायदेशीररित्या हस्तगत केली.
दरम्यान, फिर्यादीचा जबाब नोंदवून पोलिसांकडून प्राथमिक तपास अहवाल मागवण्यात आला. आनंदनगर पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालातही आरोपींनी मिळकतीचे हस्तांतरण संगनमत करून केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या खटल्यात अॅड. विशाल साखरे यांना अॅड. मंजुषा साखरे, अॅड. अमित गोळे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.
इश्यू प्रोसेसचा आदेश
या सर्व पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करून इश्यू प्रोसेसचा आदेश पारित केला आहे. तसेच आरोपीना समन्स बजावून १५ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.