उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौरा करुन उमेदवारांना विजयी मंत्र दिला (फोटो - सोशल मीडिया)
Pune News : पुणे: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 15 तारखेला मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. त्यांच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सर्वच प्रमुख नेते मैदानात उतरले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आले असून त्यांनी उमेदवारांना विजयासाठी खास कानमंत्र दिला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या (PMC Election 2026) रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठी झेप घेतली आहे. “केवळ उमेदवार म्हणून मिरवू नका, तर प्रत्येक घराचा सदस्य बना,” अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवक पदाच्या इच्छुकांना आणि उमेदवारांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काही ‘अनोखे’ आणि ‘प्रॅक्टिकल’ फंडे कार्यकर्त्यांना दिले.
हे देखील वाचा : “विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण
काय आहे अजित पवारांचा ‘अनोखा’ कानमंत्र?
बैठकीत अजित पवारांनी प्रामुख्याने ३-स्तरीय (3-Level) रणनीतीवर भर दिला:
१. ‘मायक्रो-बूथ’ मॅनेजमेंट:
अजित पवारांनी स्पष्ट केले की, निवडणूक ही मोठ्या सभांनी नाही तर ‘बूथ’वरच्या नियोजनाने जिंकली जाते. प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रभागातील प्रत्येक बूथसाठी १० विश्वासू कार्यकर्त्यांची ‘अजित रक्षक’ टीम तयार करावी, जी मतदानादिवशी शेवटच्या मतदाराला बाहेर काढेल.
२. ‘सोशल मीडिया’ नाही, तर ‘पर्सनल मीडिया’:
“नुसते फोटो टाकू नका,” असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले. “प्रत्येक प्रभागातील व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील व्हा. लोकांच्या वैयक्तिक अडचणींना डिजिटल माध्यमातून उत्तर द्या. सोशल मीडियावर आपल्या कामाचे ‘इम्पॅक्ट रिल्स’ बनवा, जेणेकरून तरुणाई आपल्याकडे आकर्षित होईल.”
३. ‘पॉकेट मीटिंग’वर भर:
मोठ्या चौक सभा करण्यापेक्षा सोसायट्यांमध्ये आणि छोट्या वस्त्यांमध्ये ‘पॉकेट मीटिंग्स’ (कोपरा सभा) घेण्यावर भर द्या. लोकांच्या थेट समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन द्या, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हे देखील वाचा : उद्धव ठाकरेंसोबतची युती राज ठाकरेंना महागात? आणखी एका जवळच्या नेत्याने सोडली साथ
भाजपच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचे आदेश
पुण्यात राष्ट्रवादीची मुख्य लढत भाजपसोबत असल्याचे पवारांनी आधीच स्पष्ट केले आहे. “भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन तिथल्या समस्या (उदा. वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न) लावून धरा. आपण केलेल्या विकासकामांची तुलना भाजपच्या पाच वर्षांच्या सत्तेशी करा,” असा आदेश अजित पवारांनी दिला आहे.
गुन्हेगारी आणि शिस्तीवर ‘दादा’ स्टाईल इशारा
उमेदवारांच्या निवडीबाबत बोलताना अजित पवारांनी स्पष्ट केले की, जनतेमध्ये दहशत असलेल्यांना थारा दिला जाणार नाही. “शिवाजीनगर असो वा उपनगरे, कोणत्याही वादात पडू नका. आपली प्रतिमा स्वच्छ ठेवा. कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी आहे,” असे त्यांनी बजावले. माझ्यासाठी प्रत्येक प्रभाग महत्त्वाचा आहे. मला रिपोर्ट नका देऊ, मला रिझल्ट पाहिजे. जो लोकांसाठी धावेल, तोच महापालिकेत दिसेल, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.






