Muralidhar Mohol gives green signal to Solapur-Goa flight service from Solapur Airport
सोलापूर : आजचा दिवस हा सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. आज सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा ही विमान सेवा सुरू होत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा हा देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडला गेला आहे. यातून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू केली जाणार असल्याची ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
विमानतळ प्राधिकरण परिसरात आयोजित सोलापूर ते गोवा विमान सेवा उद्घाटन समारंभ प्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मार्गदर्शन करत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “सोलापूर हे दक्षिण पश्चिम भागाला जोडणारा केंद्रबिंदू आहे, त्याचबरोबर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण असून येथून सुरू झालेली विमानसेवा ही सोलापूर सह या भागाच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांनाही याचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
विमान कंपन्या एखाद्या शहरातून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना लाभ मिळू शकेल का याचा विचार अगोदर करतात. त्यानंतरच विमानसेवा सुरू केली जाते आजपासून गोव्याला विमानसेवा सुरू झालेली आहेच, परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसाठी ही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आहे, त्याप्रमाणेच मुंबईसाठी ही लवकरच ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिली.
सोलापूर विमानतळ येथून केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत तिरुपती हैदराबाद व बेंगलोरसाठी ही विमानसेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. तसेच या विमानतळावर वातावरण स्पष्टता बाबत तांत्रिक अडचणी उद्भवणार नाही यासाठी डीवॉल सिस्टीम बसवणे तसेच नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करणे या अनुषंगाने पुढील काळात काम केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विमानसेवा शुभारंभाचा आजचा हा दिवस सोलापूरसाठी आनंदाचा दिवस असल्याचे सांगून सोलापूरच्या उद्योग, व्यवसाय व पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण आहे. पहिल्या टप्प्यात गोवा येथे सेवा सुरू होत असून गोवा येथून देश व विदेशात सर्व ठिकाणी विमानाने प्रवास करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच मुंबईची विमान सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ही विमान सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पत्रकार व विकास मंच यांनी केलेल्या पाठपुराव्याचे पालकमंत्री यांनी कौतुक केले.
सोलापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक चंद्रेश वंजारा यांनी आपल्या प्रास्ताविकात सोलापूर विमान तळासाठी करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली. विकासासाठी हवाई संपर्क महत्त्वाचा असल्याचे सांगून ही विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न कामी आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पाच प्रवाशांना बोर्डिंग पास
आजच्या शुभारंभाच्या विमानामध्ये प्रवास करणाऱ्या सोलापूर येथील पाच प्रवाशांना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते, प्रातिनिधिक स्वरूपात बोर्डिंग पास देण्यात आले. यामध्ये चेतन लोढा, बाळकृष्ण दोड्डी, शिवाजी सुरवसे, प्रीती शिंदे व केतन शहा या विमान प्रवाशांचा समावेश आहे. तसेच फ्लाय 91 या विमान कंपनीच्या विमानातून गोवा येथून सोलापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांचे स्वागत पुष्पहार देऊन करण्यात आले.
झेंडा दाखवून विमान सेवेचा शुभारंभ
सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच फ्लाय 91 कंपनीच्या विमानाला केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झेंडा दाखवून आजपासून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ केला. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमानतळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.