
आळेफाट्यातील 'त्या' बेपत्ता मुलांचे गूढ उलगडले; अपहरण नव्हे तर पालकांच्या भीतीतून...
आळेफाटा : आळेफाटा परिसरातील दोन अल्पवयीन मुले एकाच दिवशी बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर या मुलांचे अपहरण झाल्याच्या अफवा वेगाने पसरत होत्या. मात्र,आळेफाटा पोलिसांच्या प्राथमिक तपासात या अफवांना कोणताही आधार नसल्याचे समोर आले आहे.
संबंधित दोन्ही मुले गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे शाळेत जात नव्हती. ती शाळेचा गणवेश घालून घरातून बाहेर पडत असत; मात्र, शाळेत न जाता परिसरातील एका बंद पडलेल्या इमारतीत वेळ घालवत असत. शाळा सुटण्याच्या वेळी ती पुन्हा घरी परतत असल्याने पालकांना मुलांच्या गैरहजेरीची कल्पना आली नव्हती. अनेक दिवस गैरहजर राहिल्यानंतर शाळा प्रशासनाने पालकांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यामुळे आपली गैरहजेरी उघड झाल्याचे लक्षात येताच आणि घरी रागावले जाईल या भीतीपोटी दोन्ही मुलांनी घर सोडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
कायद्याचा रक्षक बनला भक्षक ! सामूहिक बलात्कार पीडित १३ वर्षीय मुलीचे वकिलाकडूनच लैंगिक शोषण
सध्या तरी या प्रकरणात अपहरणाचा कोणताही पुरावा आढळलेला नाही. मुलांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू असून, त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावर अपहरणासंदर्भातील अपुष्ट संदेश पुढे पाठवू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, या घटनेतून पालकांसाठीही महत्त्वाचा संदेश समोर आला आहे. मुलांच्या शालेय उपस्थितीची नियमित खातरजमा करणे, त्यांच्याशी संवाद ठेवणे आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.
नागपुरातून एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता
दुसरीकडे, नागपूर शहरातून एक अत्यंत गूढ आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य 24 जूनपासून अचानक बेपत्ता झाले असून, अनेक दिवस उलटूनही त्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती मिळाली नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुणे येथे आढळल्याने या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले असून, पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत.