
Chandrapur Earthquake : चंद्रपुरात दीड तासात दोन भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट, सुदैवाने जीवितहानी नाही
Chandrapur Earthquake : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी (16 नोव्हेंबर) संध्याकाळी अवघ्या दीड तासाच्या अंतरात भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिल्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2, तर दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 2.8 इतकी नोंदवण्यात आली.
अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक घराबाहेर पडले. मात्र, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपुरात पहिला भूकंप सोमवारी सायंकाळी 4 वाजून 14 मिनिटे 18 सेकंदांनी झाला. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूरपासून सुमारे 142 किलोमीटर दक्षिणेला होता. जमिनीखाली पाच किलोमीटर खोलीवर या भूकंपाची नोंद झाली.
त्यानंतर सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटे 39 सेकंदांनी दुसरा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नागपूरपासून सुमारे 150 किलोमीटर दक्षिण-दक्षिण-पूर्व दिशेला होता. दुसऱ्या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किलोमीटर नोंदवण्यात आली.
पहिल्या भूकंपाची तीव्रता तुलनेने अधिक आणि खोली कमी असल्याने त्याचे धक्के परिसरात स्पष्टपणे जाणवले. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने त्याचा परिणाम तुलनेने मर्यादित राहिला.
दरम्यान, दोन्ही धक्क्यांनंतर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही. पोलीस आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Nagpur News : बेसा-बेलतरोडीत खासदार बर्वे बेपत्ता लापता खासदार’चा फलक लावण्याच्या तयारीत नागरिक
भूकंप तज्ज्ञांच्या मते, 3.2 तीव्रतेचा भूकंप हा सौम्य श्रेणीत मोडतो. अशा भूकंपांमुळे सामान्यतः मोठ्या नुकसानीची शक्यता कमी असते. चंद्रपूर आणि आसपासचा परिसर भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जात नसला, तरी अधूनमधून अशा स्वरूपाचे सौम्य धक्के जाणवू शकतात.