फोटो सौजन्य सोशल मीडिया
यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. आदित्य याउलने दोन वयोगटांत अंतिम फेरी गाठत सर्वांचे लक्ष वेधले.
नागपूरचा आदित्य याउल या स्पर्धेतील सर्वात यशस्वी खेळाडू ठरला. त्याने दोन वेगवेगळ्या वयोगटांत अंतिम फेरीपर्यंत मजल मारत एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले. १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात आदित्यने प्रज्ञान शिंदेचा १५-१२, ९-१५, १५-११ असा पराभव केला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात त्याने संयम आणि आक्रमक खेळाच्या जोरावर विजेतेपद मिळवले.
त्यानंतर १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटातही त्याने अंतिम फेरी गाठली. मात्र, अंतिम सामन्यात एल. अभिज्ञान सिंघा याच्याकडून ८-१५, १३-१५ असा पराभव झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दोन वयोगटांत अंतिम फेरी गाठणे ही त्याच्या खेळातील सातत्याची पावती ठरली.
नागपूरच्या साईराज नायसेनेही दोन प्रकारांत कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात त्याने मुंबई उपनगरच्या सत्य चौहानसोबत जोडी बनवली होती. या जोडीने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सलग विजय मिळवत आगेकूच केली. मात्र, उपांत्य फेरीत सयाजी शेलार आणि उदयन देशमुख यांच्या जोडीकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे कांस्यपदक मिळाले. यानंतर १७ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात साईराजने कोल्हापूरच्या ऋतिका कांबळेसोबत सहभाग घेतला. या जोडीनेही उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, राघवेंद्र यादव आणि शर्वरी सुरवसे यांच्या जोडीकडून पराभव झाल्याने त्यांना कांस्यपदक मिळाले.
नागपूरच्या पदकतालिकेत देवांश ठक्कर आणि कपिश कोल्हे यांनीही महत्त्वाची भर घातली. १५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटात या दोघांनी एकत्रितपणे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेतील विविध फेऱ्यांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देत त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.
अखेर या जोडीने कांस्यपदक पटकावले. दरम्यान, १५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात नागपूरच्या सान्वी घाटेने पुण्याच्या रुद्रनिराजे निंबाळकरसोबत जोडी बनवत अंतिम फेरी गाठली. नागपूरच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या या सामूहिक कामगिरीमुळे शहराच्या बॅडमिंटन क्षेत्रातील गुणवत्ता पुन्हा अधोरेखित झाली आहे.






