Nagpur: नागपूरला आता ‘संत्रा नगरी’ सोबतच ‘जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे शहर’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावर तयार केलेल्या जगातील सर्वात लांब ‘डबल डेकर’ पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी हे गौरवउद्गार काढले.
🌟 अभिमानस्पद! अभिमानास्पद! 🌟#नागपूरमेट्रो चा कामठी रोड डबल डेकर व्हायाडक्ट आता थेट जागतिक नकाशावर! 🚇✨
चार स्तरांच्या अद्वितीय वाहतूक प्रणालीसह हा पूल आता अधिकृतपणे #जागतिक_विक्रम धारक ठरला आहे.#गिनीज_बुक_ऑफ_वर्ल्ड_रेकॉर्ड मध्ये मेट्रो विभागातील ”सर्वात लांब डबल डेकर”… pic.twitter.com/tJ0mTbTVCf
— Nagpur Metro Rail (@MetroRailNagpur) September 2, 2025
रामगिरी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.
याआधीही, छत्रपतीनगर येथील ३.२ किमी लांबीच्या डबल डेक उड्डाणपुलाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.
या पुलाच्या निर्मितीमुळे महामेट्रो आणि नागपूर शहर हे जागतिक पातळीवर ‘पायोनिअर’ बनले आहेत. जगातील अनेक देशांमधील अभियांत्रिकी आणि स्थापत्य कलेतील तज्ज्ञ या पुलाची माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी नागपूरला भेट देत आहेत. हा पुल रेल्वे, महामार्ग आणि मेट्रो वाहतूक यांना एकाच ठिकाणी एकत्र आणणारे जगातील पहिले अभियांत्रिकी उदाहरण आहे. याप्रसंगी महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, प्रकल्प संचालक राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, महाव्यवस्थापक यतिन राठोड, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एन व्ही पी विद्यासागर तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित होते.