(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Phulpakharu Song: बालपण म्हणजे निरागसता, कल्पनाशक्ती, स्वप्नं आणि आनंदाने बहरलेलं सुंदर विश्व! याच भावविश्वाची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ हे नवं मराठी गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सोशल मीडिया क्वीन आणि अभिनेत्री मनिषा इंगळे, अभिनेता सनी कांबळे आणि बालकलाकार रिधिमा निचित या गाण्यात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.
टाइमलेस स्लेट्स प्रस्तुत आणि टाइमलेस स्लेट्स प्रॉडक्शन्स निर्मित या गाण्यात एका चिमुकल्या परीचं रंगीबेरंगी, स्वप्नवत आणि कल्पनारम्य विश्व उलगडण्यात आलं आहे. रंगीबेरंगी फुलपाखरं, परीचं रूप, आकर्षक दृश्यरचना आणि कुटुंबातील प्रेमळ क्षण यांची सुंदर सांगड गाण्यात पाहायला मिळते. गाण्याच्या पोस्टरनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
‘फुलपाखरू’ गाण्याचं चित्रीकरण पुण्यातील विविध ठिकाणी करण्यात आलं आहे. या गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केलं आहे. निर्मितीची जबाबदारी सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी सांभाळली आहे.
गाण्याला प्रज्वल यादव आणि विवेकानंद सणप यांचं संगीत लाभलं आहे, तर नव्या सणप आणि ऋषभ साठे यांनी ते गायलं आहे. गीतलेखन विवेकानंद सणप यांचं आहे. असिस्टंट डायरेक्टर म्हणून रोहन वाते आणि कुमार गायकवाड यांनी काम पाहिलं आहे. एडिटिंग विनय शिंदे, डीआय मयूर सातपुते, व्हीएफएक्स असारफ शेख आणि आर्ट डायरेक्शन सनी कांबळे व नितीश कुमार यांनी सांभाळलं आहे.
प्रसिद्धी डिझाइनची जबाबदारी अनिकेत महाडिक यांनी, तर पीआरची जबाबदारी विनया सावंत (फॉरेवर पीआर) यांनी सांभाळली आहे. गाण्याच्या बीटीएससाठी रवी शिंदे, प्रिया आणि रुद्र यांनी काम केलं आहे.
गाण्याच्या चित्रीकरणाविषयी अभिनेत्री मनिषा इंगळे सांगते, “मला गाण्याची ऑफर आली तेव्हा मी लगेचच हो म्हटलं होतं. मी पहिल्यांदाच एका आईच्या भूमिकेत काम केलं आहे. याआधी मी अनेक रोमँटिक आणि ट्रेंडिंग गाण्यांमध्ये काम केलं आहे.”
पुणे शहरासह जवळच्या गावांमध्ये झालेल्या चित्रीकरणाचा अनुभवही तिने सांगितला. प्रॉडक्शनकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे शूटिंग करताना खूप मजा आली. विशेष म्हणजे गाण्यातील दृश्यांसाठी तयार केलेले सेटअपही खूप सुंदर होते, असं मनिषाने नमूद केलं.
बालपणातील निरागसता, कुटुंबातील प्रेम आणि कल्पनाविश्वातील रम्य क्षणांचा अनुभव देणारं ‘फुलपाखरू’ हे गाणं लहान मुलांसह मोठ्यांनाही नक्कीच आवडेल, अशी आशा मनिषा इंगळेने व्यक्त केली आहे.






