फोटो सौजन्य सोशल मीडिया
टिपू सुलतान चौकातील नूरी मशिदीजवळ प्लॉट क्रमांक ८९९ येथे दोन स्वतंत्र ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी फैम अन्सारी (४०, रा. मेहबूबपुरा) हा तेथे आढळून आला. पंचांसमक्ष घराच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीवर असलेल्या पत्र्याच्या शेडखालील खोलीची झडती घेण्यात आली. त्यात प्रतिबंधित गुटखा आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळला.
यानंतर पोलिसांनी फैमचा भाऊ नदीम ऊर्फ लखन नबी अहमद अन्सारी (३८) याच्या भाड्याच्या घरालगत असलेल्या दुसऱ्या खोलीचीही तपासणी केली. तेथे देखील प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला आढळून आला. दोन्ही ठिकाणांहून जप्त केलेल्या मालाची किंमत ९ लाख ३७ हजार ९५१ रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
Nagpur News : रूपम फूड्वर एफडीएचा छापा; ७ लाखांचा माल केला जप्त १५ टन संशयित नूडल्स
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत फैमने जप्त केलेला साठा त्याचा भाऊ नदीम ऊर्फ लखन याच्या मालकीचा असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. दोघे भाऊ मिळून शहरातील विविध पानठेल्यांवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा गुप्तपणे पुरवठा करीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. हा साठा नेमका कुठून आणला जात होता, त्याची विक्री कोणामार्फत केली जात होती आणि शहरातील किती पानठेल्यांपर्यंत त्याचे जाळे पसरले आहे, याचा तपास सुरू आहे.
पोलिस उपनिरीक्षक सदाशिव कानसे यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि संबंधित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मूळ पुरवठादार शोधण्याबरोबरच या अवैध व्यवसायामागील संपूर्ण साखळी उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.






