फोटो सौजन्य सोशल मीडिया
महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटरधारक घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरासाठी प्रति युनिट ८५ पैसे सवलत दिली जात आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी ८.८६ कोटी रुपयांची बचत केली आहे.
तर वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांना १.५१ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. दोन्ही जिल्ह्यांतील एकूण बचतीचा आकडा १०.३७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दरमहा वाढत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
स्मार्ट टीओडी मीटरमुळे मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला जात असल्याचे ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. केवळ एका महिन्यात नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील ५ लाख १ हजार ५७२ ग्राहकांना एकूण १.४४ कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे.
महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार सध्या मिळणारी प्रति युनिट ८५ पैशांची सवलत नजीकच्या भविष्यात एक रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी आर्थिक फायदा मिळू शकतो.
स्मार्ट मीटरबाबत काही भागांत गैरसमज पसरवून विरोध करण्यात आला होता. मात्र, या मीटरमुळे होणारी बचत समोर आल्यानंतर ग्राहकांचा दृष्टिकोन बदलत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी ग्राहकांना स्मार्ट मीटरबाबत वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले आहे. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसून ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे.
याशिवाय महावितरणच्या मोबाईल अॅपवर ग्राहकांना तासानुसार आणि दिवसानुसार वीज वापराची माहिती पाहता येते. त्यामुळे कोणत्या वेळी किती वीज खर्च होते, हे समजून घेऊन ग्राहकांना आपल्या वापराचे नियोजन करता येणार आहे. आगामी काळात प्रति युनिट एक रुपयांची सवलत लागू झाल्यास स्मार्ट मीटरचा फायदा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.






