
Nitin Gadkari
Nitin Gadkari : निवडणुकीच्या राजकारणात जातीय समीकरणं आणि तिकीटवाटपाचा मुद्दा कायम चर्चेत असतो. याच विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील चर्मकार समाजाच्या मेळाव्यात भाष्य केलं. समाजाच्या नावावर तिकीट मागणं आणि त्यानंतर समाजासाठी प्रत्यक्ष काम करणं या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं गडकरी यांनी म्हटलं.
नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी समाजाच्या विकासासाठी शिक्षण, ज्ञान आणि कौशल्याला महत्त्व असल्याचं सांगितलं. ‘मी या जातीचा आहे, मला तिकीट द्या’, असं म्हणणारे अनेक जण असतात; मात्र तिकीट मिळाल्यानंतर समाजासाठी काहीच केलं जात नाही, असं त्यांनी म्हटलं. केवळ एखाद्या समाजातील व्यक्तीला राजकीय तिकीट मिळाल्याने त्या समाजाचा विकास होतोच असं नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
समाजाच्या विकासासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करण्याची गरज असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. सरकारकडून चर्मकार समाजासाठी जे काही करता येईल ते केलं जाईल, मात्र समाजातील लोकांनीही शिक्षण आणि कौशल्याच्या माध्यमातून पुढे जाण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
यावेळी गडकरी यांनी कौशल्याच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकतो, याचाही उल्लेख केला. चर्मकार समाजातील पारंपरिक कौशल्याला आधुनिक व्यवसायाची जोड देण्याची गरज असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झालं. दरम्यान, गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचाही उल्लेख केला. समृद्धी महामार्गामुळे नागपूरहून मुंबईकडे प्रवास अधिक सुलभ झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी संत रविदास महाराजांच्या विचारांचा संदर्भ दिला. नितीन गडकरी यांनी त्यांच्या मातोश्रीच्या नावाने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुरू केल्याचा उल्लेख फडणवीस यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणारे सर्वाधिक गुण साधारण 80 ते 82 टक्क्यांपर्यंत होते; आता हे प्रमाण 96 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.
‘माणूस जन्माने मोठा होत नाही, तर ज्ञानाने मोठा होतो’, असा संत रविदास महाराजांचा संदेश असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. जात-पात बाजूला ठेवून माणसाची उन्नती कशी होईल, हा विचार रविदास महाराजांनी समाजासमोर मांडल्याचंही त्यांनी नमूद केलं.
विरोधी पक्षांची ताकद आता वाढणार; इंडिया आघाडीमध्ये ‘या’ बड्या पक्षाचे ‘कमबॅक’ होणार