फोटो सौजन्य AI
त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसोबतच रोजच्या स्वयंपाकाचा खर्चही वाढला आहे. कांद्याच्या वाढत्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून, सणासुदीच्या काळात ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार, आगामी दीड महिन्यापर्यंत कांद्याच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याचे घाऊक दर प्रतिकिलो ५५ ते ६५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यात वाहतूक खर्च आणि कमिशनपोटी अतिरिक्त पाच टक्के शुल्क द्यावे लागत असल्याने विक्रेत्यांचा खरेदी खर्च आणखी वाढत आहे.
परिणामी, किरकोळ विक्रेत्यांना घाऊक बाजारातून कांदा ६५ ते ७० रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. त्यानंतर किरकोळ बाजारात चांगल्या दर्जाचा कांदा ८० रुपये किलोने विकला जात आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या ग्राहकांना या दरवाढीमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे.
Nagpur Crime : शेंगांचा ठेला ते एमडीचा धंदा; ३०० रुपये रोज कमावणारा ‘फल्ली’ कसा बनला कोट्यधीश
कांद्याच्या दरवाढीमागे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत हे प्रमुख कारण असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जुन्या कांद्याचा साठा जवळपास संपुष्टात आला असून, नवीन पीक मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कांद्याची मागणी वाढत असताना पुरवठा मर्यादित असल्याने दर चढेच आहेत. दलालांकडूनही आगामी किमान दीड महिनाभर कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता नसल्याचे विक्रेत्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी काही काळ महाग कांदा खरेदी करावा लागण्याची शक्यता आहे.
कांद्याबरोबरच लसूण आणि आल्याच्या दरांनीही ग्राहकांना हैराण केले आहे. घाऊक बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये आहेत, तर किरकोळ बाजारात लसूण ३२० ते ४०० रुपये किलोने विकला जात आहे. थंडी वाढल्यानंतर लसणाची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दर चढेच राहतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
दुसरीकडे, जुन्या आल्याचा साठा जवळपास संपल्याने बाजारात नवीन आल्याची विक्री सुरू झाली आहे. नवीन आल्याचे दर प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांदरम्यान आहेत. त्यामुळे कांदा, लसूण आणि आले या तिन्ही महत्त्वाच्या पदार्थांच्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे.






