
खासगी वाहनांवर 'पोलिस' शब्द लिहिणे पडणार महागात; सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना दिले कारवाईचे आदेश
नांदेड : खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांवर लाल रंगातील ‘पोलीस’ पाटी किंवा ‘पोलीस’ असे नाव लिहून फिरणाऱ्या वाहनांवर राज्यभर विशेष कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने दिले आहेत. अशा पाट्यांचा गैरवापर करून बेकायदेशीर कृत्ये केली जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांनी सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस अधीक्षकांना आवश्यक कारवाईचे निर्देश दिले आहेत.
या संदर्भातील तक्रार सखाराम कुलकर्णी यांनी २७ जून २०२६ रोजी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे केली होती. तक्रारीत अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल पाटी किंवा लाल अक्षरांत ‘पोलीस’ नाव लावून फिरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापूर्वीही अशा प्रकाराबाबत उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून कारवाईचे निर्देश दिल्याचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ‘पोलीस’ अशी पाटी असल्यामुळे तपासणीदरम्यान अनेक वाहने विनातपासणी सोडली जातात. त्यामुळे अशा वाहनांचा वापर भाडेतत्त्वावर करणे, अवैध वस्तूंची वाहतूक करणे किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
शासनाने या तक्रारीची गंभीर दखल घेत संबंधित अर्जाची प्रत राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस अधीक्षकांना पाठवली आहे. खाजगी वाहनांवर अनधिकृतपणे ‘पोलीस’ पाटी किंवा नाव वापरताना आढळल्यास महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३ (६) तसेच मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम १७७ अन्वये संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.