धक्कादायक! १२ वर्षांपासून आधार कार्डसाठी 'तिचा' वनवास, अखेर प्रशासनाला दिला आत्महत्येचा इशारा
अनुष्काचे वय १५ वर्षे असून ती सध्या ९ वीत शिकत आहे. तिच्याकडे पूर्वी आधार कार्ड होते, मात्र तांत्रिक कारणास्तव ते ‘कार्यान्वित’ नसल्याचे सांगण्यात आले. पुढील वर्षी दहावीचे वर्ष असल्याने शाळेकडून वारंवार आधार कार्डची मागणी होत आहे. आधार नसल्यास तिला बोर्डाची परीक्षा, शासकीय योजनांचा लाभ, रेशन आणि बँक खाते यांपासून वंचित राहावे लागणार आहे.
पालकांच्या आरोपानुसार, अनुष्का गेल्या १२ वर्षांपासून आधार कार्डसाठी पाठपुरावा करत आहे. चांदवडमधील जवळपास सर्व आधार केंद्रांवर चकरा मारल्या. प्रत्येक वेळी बायोमेट्रिक्स घेतले जातात आणि १५ दिवसात कार्ड येईल असे सांगितले जाते, मात्र कार्ड येत नाही. याप्रकरणी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अगदी मुंबईतील आधार मुख्य कार्यालयाकडेही धाव घेतली, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अनुष्का त्रासली असून, प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थिनीला आत्महत्येचा इशारा द्यावा लागणे, प्रशासनाचे अपयश असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
अनुष्काने जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारयांना दिलेल्या निवेदनात आपली व्यथा मांडली आहे. तिने आपल्या अर्जासोबत जन्म दाखला आणि जुन्या आधार कार्डची प्रत जोडली असून, येत्या ८ दिवसात न्याय देण्याची मागणी केली आहे. एका बाजूला सरकार ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा नारा देत असताना, केवळ एका तांत्रिक कागदपत्रामुळे एका मुलीचे शिक्षण धोक्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
मी स्त्री शिक्षणाच्या जाहिराती पाहते, पण जर मला आधार कार्डविना शिक्षणाचा आणि जगण्याचा अधिकारच मिळत नसेल, तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया देवरगावची विद्यार्थिनी अनुष्का शिरसाठ हिने दिली.






