आता काही खरं नाही...! राज्यात 'या' दिवशी वादळी पावसाचा इशारा, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
Unseasonal Rain In Maharashtra News In Marathi : पुढील तीन दिवसांत महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. परिणामी राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. हवामानातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे नागरिकांमध्ये विशेषतः आंबा उत्पादकांमध्ये आधीच घबराट पसरली आहे, कारण त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याचा धोका आहे.
हवामान विभागाने (IMD) राज्यातील सात जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवसांकरिता पावसाचा इशारा दिला आहे. या बदलामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी, शेतकऱ्यांसमोर एक नवीन समस्या निर्माण होऊ शकते. पिकांचे मोठे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचीही शक्यता आहे. काही भागांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.
गोंदियात मुख्याध्यापक व केंद्र संचालक निलंबित; जिल्हा परिषदेच्या सीईओंची धडक कारवाई
याव्यतिरिक्त, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत. ऑरेंज अलर्ट असलेल्या भागांमध्ये जोरदार वादळे आणि मुसळधार गारपिटीचा धोका आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.
– मार्च महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. आता पावसामुळे तापमान खाली येण्याची शक्यता आहे.
– यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळेल. ३१ मार्चपासून पुढील ३-४ दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता आहे.
मात्र, या दिलाशाने शेतकऱ्यांसाठी समस्या निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक जिल्ह्यांतील पिकांचे आधीच नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात, दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. ही समस्या केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांतील शेतकरीही अवकाळी पावसामुळे समस्यांना तोंड देत आहेत. पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात देखील काही जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये हलक्या पावसामुळे हवामान सुखद झाले असून उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. हवामानातील या बदलामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. येत्या काही दिवसांत हवामानाच्या परिस्थितीवर सर्वांचे लक्ष असेल.






