नवी मुंबई/सिद्धेश प्रधान : मराठवाडा व सोलापूर जिल्ह्याला पावसाने झोडपल्याने शेतीचे, घरादारांचे नुकसान झाले आहे. शासनाने मदत जाहीर केली असली तरी उभा संसार पाण्याखाली गेल्याने ती मदत तुटपुंजी ठरण्याची शक्यता आहे. अशात राज्यातून देशातून असंख्य मदतीचे हात पूरग्रस्तांसाठी पुढे येऊ लागले आहेत. यात नवी मुंबईतून देखील नागरिक पुढाकार घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या आवाहनानुसार. नवी मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या पत्नी मधुरा गेठे यांनी देखील पूरग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील पुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या ५ मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मधुरा गेठे या समाज कार्याची आवड आहे. विविध सामाजिक कार्यात त्या सहभागी होत असतात. समाजभान राखताना संवेदनशीलता अग्नी असणे गरजेची असते. त्यातूनच समाजभान जपता येते. नुकत्याच झालेल्या पावसामुळे मराठवाडा संपूर्ण पुराने वेढला आहे. अनेक गावांनी तर उभ्या आयुष्यात इतके पाणी पहिल्यांदा पाहिले असावे. मात्र या पावसाने शेतीची वाताहत केलीच शिवाय कुटुंबांची देखील वाताहत झाली. कंबरेपेक्षा जात पाणी गावकऱ्यांच्या घरात शिरले होते. अन्न धान्य, कपडलत्ता, शासकीय कागदपत्रे कमावलेले सगळे पाण्यात वाहून गेले. यासोबत विद्यार्थ्यांची वह्या पुस्तके देखील वाहून गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
अशात मधुरा गेठे यांनी पुढे येत धाराशिव जिल्ह्यातील मुलींना मदतीचा हात दिला आहे. त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च हा मधुरा गेठे करणार आहेत. त्यामुळे शालेय ते उच्च शिक्षणाचा प्रश्न सुटला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना लागेल ती मस्त करण्याची तयारी गेठे यांनी दर्शविली आहे. मधुरा गेठे म्हणाल्या की, हजारो विद्यार्थ्यांना आज मदतीची गरज आहे. अन्न धान्य कपडे, गरजेच्या वस्तू पोहोचत आहेत. सरकारी मदत मिळणार आहे. मात्र त्यांना या मदतीसोबत शैक्षणिक मदतीची गरज आहे. काही कुटुंबियांची अवस्था इतकी बिकट आहे की, त्यांचे काहीच शिल्लक राहिलेले नाही. अशा कुटुंबियातील मुलींची जबाबदारी आम्ही घेतली आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात हवा आहे. नागरिकांनी समाजभान जपणाऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन मधुरा गेठे यांनी केले आहे.