धर्मांध राकेश किशोर यांच्यावर गृह विभागाने अँट्रासिटी दाखल करून, न्याय व्यवस्थेविषयी आदर सिध्द करावा
पुणे : ‘सनातन धर्माचा’ उच्चार करत, जातीय-धर्मांधतेने आंधळी झालेली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात ‘देशाच्या सरन्यायाधीशां’वर बूट फेकण्याचा निंदनीय हल्ला करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा भारतातील ‘राम मंदिर उभारणीत ‘न्याय व्यवस्थेचे योगदान’ विसरते काय? असा संतप्त सवाल काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी उपस्थित केला.
गोपालदादा तिवारी यांनी पुढे म्हटले की, 450 वर्ष प्रलंबित ‘राम मंदिर – बाबरी मशीद’ वाद स्वतंत्र व प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीनंतरच लोकशाहीचा तिसरा स्तंभ समजल्या जाणाऱ्या ‘न्याय-व्यवस्थेच्या आधारेच’ शांततेने व कायदेशीर तोडग्याने सुटू शकला, हे स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची गुण संपन्नता आहे. मात्र, ‘सनातन धर्मा’चा ढोल पिटणाऱ्या व विकृतीने ग्रासलेल्या प्रवृत्तीला हे दिसू नये वा समजू नये? हे सखेद आश्चर्य आहे, असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा : संतापजनक! सरन्यायाधीश भूषण गवईंवर बुटाने केलेल्या हल्ल्याचे भाजप नेत्याकडून कौतुक; वाद पेटणार?
दरम्यान, सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा निंदनीय प्रयत्न हा ‘संविधानिक न्याय व्यवस्थेवर’ हल्ला असून, पंतप्रधानांनी केवळ ट्वीट व फोनद्वारे निषेध करून थांबू नये, तर न्यायव्यवस्थेवर जातीय व धर्मांधतेचे जाणीवपूर्वक दडपण आणणाऱ्या व विकृतीने ग्रासलेल्या राकेश किशोर यांच्यावर केंद्र सरकारने ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करून संविधानिक न्याय-व्यवस्थेविषयी आदर व सन्मान कृतीने सिद्ध करावा, अशी मागणीही गोपाळदादा तिवारी यांनी केली.
काही दिवसांपूर्वी झाला होता प्रयत्न
सरन्यायाधीश बी. आर. गवई (Bhushan Gawai) यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात वकील राकेश किशोर यांनी हा बूट फेकल्याचे समोर आले आहे. सुरक्षा रक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी वकिलांना बाहेर काढले. या प्रकरणाची संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा सुरु असून, तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे वकील राकेश किशोर यांनी केलेल्या कृत्याबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणावर भाजप (BJP) नेत्याने प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्लेखोराचे कौतुक केले आहे.