
NCP holds review meeting at Naigaon for local body elections political news
Local Body Elections 2025: नायगाव: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत.. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये 02 डिसेंबर रोजी मतदान आणि 03 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने देखील यंत्रणा कामाला लावली आहे. दरम्यान, नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.
आता माझे राजकारण करण्याचे वय राहिले नाही. आता माझी भूमिका मार्गदर्शकाची आहे, असे स्पष्ट वक्तव्य माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी नायगाव येथे केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. खतगावकर म्हणाले, सध्याच्या काळात प्रतापराव पाटील चिखलीकर सारखा सक्रिय नेता जिल्ह्यात नाही.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बैठकीमध्ये भास्करराव खतगावकर म्हणाले की, “मी आता केवळ सर्वांना मार्गदर्शन करण्याचे काम करतोय.” त्यांच्या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बैठकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार अविनाश घाटे, सुभाष साबणे, मोहन अण्णा हंबर्डे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, तसेच कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे बोलताना खतगावकर म्हणाले, “राजकारणात आता मी थोडं मागे झालो असलो तरी कुठे कोणाची कुस्ती कोणा सोबत लावायची? याचे पक्के नियोजन अजूनही करतो. शिवराजला दादांचा आशीर्वाद आहे. कुंटुरमध्ये तो चांगली फाईट देऊ शकतो. त्याचा राजकारणातील अनुभव मोठा आहे. तीन जिल्हा परिषद निवडणुकांत तो लढला असून एका निवडणुकीत जिल्हा परिषदेचा सभापती म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर वातावरणात हास्याची लकेर पसरली, आणि बैठकीला रंग चढला. बोलता बोलता खतगावकर यांनी होटाळकरांना अनेक राजकीय चिमटे काढले,” या बाबीची उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.