फुले चित्रपटाच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया (फोटो - टीम नवराष्ट्र)
पुणे : महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आजन्म महिला शिक्षण, महिलांचे हक्क, अस्पृश्यता निवारण आणि विधवा पुर्नविवाह अशा मुद्द्यांसाठी लढा दिला. त्यांच्या जीवनावर आधारित फुले हा जीवनपट काढण्यात आला आहे. मात्र या चित्रपटावरुन जोरदार राजकारण तापले आहे. फुले चित्रपटाला ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे. तर सेन्सॉर बोर्डने देखील चित्रपटातील अनेक दृष्यांवर आक्षेप घेतला आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. फुले चित्रपटातील काही चित्रीकरणावर आक्षेप घेतला जात असून हे प्रसंग काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. मात्र छगन भुजबळ यांनी फुले चित्रपटाच्या बाजूने भक्कम बाजू मांडली आहे. भुजबळ म्हणाले की, फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. त्यावेळी सगळेच ब्राम्हण हे फुलेंच्या विरोधात नव्हते. तर कर्मठ ब्राम्हण हे फुलेंच्या विरोधात होते, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छगन भुजबळ यांनी यापूर्वी देखील फुले चित्रपटाच्या पाठीशी भक्कम भूमिका घेतली होती. भुजबळ म्हणाले होते, “आपण इतिहास विसरत चाललो आहोत. महात्मा फुले यांचं लेखन, संपादन व कृती ही त्या वेळच्या कर्मठ ब्राह्मणांविरोधात आहे. त्यांचा लढा ब्राह्मणांविरोधात नव्हे, तर ब्राह्मण्यवादाविरोधात आहे. हे जाणून घेण्यासाठी ‘फुले’ चित्रपट सर्वांनी पाहिला पाहिजे. जातीयवाद करून इतरांना कमी लेखणाऱ्यांनी हा चित्रपट पाहणं आवश्यक आहे. ‘फुले’ चित्रपटाला अनाठायी विरोध करण्यापेक्षा त्या वेळचा इतिहास समजून घेतला पाहिजे.” अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. हा चित्रपट बनवणाऱ्या लोकांनी चित्रपटात सत्य दाखवले आहे. ते दाखवत असताना आम्ही आजच्या ब्राह्मणांना अजिबात सॉफ्ट टार्गेट करत नाही. त्यावेळी सगळेच ब्राह्मण हे फुलेविरोधात नव्हते. अनेकांनी स्त्री शिक्षणासाठी महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना मदत केली होती. मात्र, काही कर्मठ ब्राम्हण फुलेंच्या विरोधात होते. त्यांच्याबरोर आमच्या बहुजन समाजातील अंधश्रद्धेत बुडालेले लोकही होते, ज्यांनी फुले दाम्पत्याला विरोध केला होता.” अशी स्पष्ट भूमिका अजित पवार गटाचे नेते व आमदार छगन भुजबळ यांनी घेतली आहे.