सौजन्य- टीम नवराष्ट्र
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेत थेट इंग्रजीतून शपथ घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांच्या इंग्रजीतून घेतलेल्या शपथेची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंकेचे कौतुक केलं आहे. त्याच वेळी त्यांनी लंकेंना इंग्रजी भाषेवरून हिणवणाऱ्या भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.
“ही खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला आनंद आहे. संसदेत मराठीच काय कोणत्याही भाषेत बोलता येते. तेथे प्रत्येक भाषेचे भाषांतर केले जाते. त्यामुळे एखादी जन माणसांत काम करणारी व्यक्ती देशाच्या संसदेत जात असेल आणि तिच्या भाषेवरून प्रश्न उपस्थित केले जात असतील तर ते शहाणपणाचे लक्षण नाही. त्याचे उदाहरण निलेश लंकेंनी दिले याचा आम्हाला अभिमान आहे.” अशा शब्दांत शरद पवार यांनी निलेश लंकेंचे कौतुक केले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आमदार संग्राम जगताप यांनी ‘रील पेक्षा रियलमध्ये विकास करणाऱ्या खासदाराला आपल्याला संसदेत पाठवायचे असल्याचे म्हटले होते. तसेच, सुजय विखेंचा एक व्हिडीओ दाखवत, काही जण रिल्स बनवू काम केल्याचा दिखावा करतात, असा टोलाही लगावला होता. जगताप यांनी दाखवलेल्या काही व्हिडीओमध्ये विखे पाटील यांच्या संसदेतील इंग्रजी भाषणांचांही समावेश होता.
याच इंग्रजी भाषणांचा धागा पकडून सुजय विखेंनी, ‘मी जेवढे इंग्रजी बोललो तेवढे समोरच्या उमेदवाराने किमान पाठ करून सभेत बोलून दाखवावे. तसे झाले तर मी माझा उमेदवारी अर्जच भरणार नाही.’ असे आव्हान दिले होते. पण निलेश लंके यांनी हे आव्हान स्वीकारले आणि संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनी निलेश लंकेंचे तोंडभरून कौतुक केले आहे.