निमसाखर : येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयावरील ध्वजारोहण सरपंच धैर्यशील रणवरे, तलाठी कार्यालयावरील ध्वजारोहण पोलीस पाटील मोनिका रणवरे, तर एनईएस हायस्कूलवरील ध्वजारोहण जेष्ठ नागरिक व जीवन शिक्षण मंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक जाफर सुलेमान शेख या ९६ वर्षीय शिक्षकांनी केले.
-आ. मानेंतर्फे शाळेला ११ लाखांचा निधी
निमसाखर येथील एनईएस हायस्कूल येथे देशभक्तीपर गिते, शिव तांडव नृत्य यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ७५ वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहोळचे आमदार यशवंत माने होते. माने यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना बालकांसाठी एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी दिली. तसेच ही शाळा माझी असून शाळेसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार रणवरे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत शाळेच्या वाढत्या आलेखाची माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष संजय सुर्यकांत रणवरे, सचिव धनंजय रणवरे, यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नंदकुमार रणवरे, ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे, मुख्याध्यापक चंद्रकांत रणवरे, निमसाखर व पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.