"अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा...", नितेश राणे यांचे आदेश
मुंबई : अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्यव्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, असे आदेश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.
अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री राणे यांनी सांगितले, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ आहे. अधिकाऱ्यांनी स्वतः मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त मत्स्य शेतकऱ्यांची भेट घ्यावी. पंचनामे करताना वस्तुनिष्ठ महिती घ्यावी. ज्या जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी अधिकारी कमी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी न झालेल्या इतर जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त करून पंचनामे लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पंचनाम्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून त्याची प्रत मंत्रालय स्तरावर सादर करावी. मत्स्य बिजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची सविस्तर माहिती सादर करावी. माहिती सादर करत असताना बाब निहाय अकडेवारी द्यावी, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.
मंत्री राणे म्हणाले की, तलावातील गाळ काढला गेला नसल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करावे. या कामासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. अधिकाऱ्यांनी रोज किमान आठ ते दहा तलावांना भेट द्यावी. दिलेल्या भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर करावा असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.
तसेच प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी आराखडा तयार करा. तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करून महिना अखेरपर्यंत हे महामंडळ स्थापन करावे अशा सूचना नितेश राणे यांनी दिल्या. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतील मोठा निधी हा पायाभूत सुविधा उभारणीवर खर्च होत असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, या पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावीत आणि त्यासाठीचा संपूर्ण निधी खर्च करावा. तसेच जे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू झालेले नाहीत त्यांचे नियोजन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना २ मध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही करावी. निधी १०० टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक लाभार्थी योजनांवर भर द्यावा. बाब निहाय खर्चाचे नियोजन करावे, असेही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.
Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा
मच्छिमारांसाठी स्थापन करण्यात येत असलेले महाराष्ट्र सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ आणि महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. मच्छिमारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी या महामंडळांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. त्यामुळे याला प्राधान्य देण्यात यावे. या महिना अखेरीस ही दोन्ही महामंडळे स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी अशा सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या.