"दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना...", जितेंद्र आव्हाडांचा इशारा (फोटो सौजन्य-X)
ठाणे : गेल्या अनेक दिवसांपासून कळवा, मुंब्रा भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सोडविण्यात येत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी थेट ठाणे महानगर पालिकेवर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते शानू पठाण आणि कळवा, मुंब्रा परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. गणेशोत्सवात पाण्याची टंचाई निर्माण झाली होती, आता नवरात्रोत्सवातही पाणी टंचाई आहे. आता आम्ही तुम्हाला दरऱ्यापर्यंत मुदत देत आहोत. जर, नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवू, असा इशारा यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
कळवा आणि मुंब्रा येथील विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाणीपुरवठा करताना ठाणे महानगर पालिकेकडून सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. या संदर्भात तक्रार केल्यानंतरही कार्यवाही होत नसल्याने आज डॉ.जितेंद्र आव्हाड, शानू पठाण यांच्यासह येथील महिलांनी ठाणे पालिकेत धडक दिली.
डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी या महिलांसह पाणी खात्याचे अभियंता विनोद पवार यांच्या दालनात ठाण मांडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी, कळवा- मुंब्रा परिसरातील पाणी टंचाईमागे राजकीय कारण आहे. ठाणे शहरात सर्वत्र पाणी उपलब्ध असताना कळवा, मुंब्र्यात पाण्याची टंचाई का? मुंब्र्याच्या अल्मास कॉलनीतील संप-पंप केंद्राचा पंप सहा दिवस बंद आहे. अवघे पाच हजार रूपये खर्च असताना तो देखील पालिका करीत नाही. कल्याण फाटा येथे वॉल्व्ह उघडून पाणी डायव्हर्ट केले जात असल्याने मुंब्र्याला पाणी पुरवले जात नाही. कळवा, मुंब्रा भागातील गोरगरीब जनतेला तहानेने मारण्याचा विचार आहे का? कळवा, मुंब्र्यातील ही पाणी टंचाई आता सहन करण्याच्या पलिकडे आहे. असे असताना सत्ताधारीच मोर्चे काढत आहेत. पाणी देण्याची जबाबदारी शासनाची आहे. सरकारने पाण्याचा पुरवठा वाढविण्याचे सोडून मोर्चे कसले काढताय?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
मेट्रोसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठाण्यात येतात. निवडणुकीसाठी पूर्णत्वास न आलेल्या मेट्रोची ट्रायल रन घेतली जाते. मात्र, पाण्यासारखी मूलभूत गरज भागविली जात नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, कळवा- मुंब्र्यात पाणी नाही मात्र नौपाड्यात प्रचंड पाणीपुरवठा होत आहे. मग, इतर भागांनी काय पाप केले आहे. दलित, शोषित वर्गाला जाणीवपूर्वक पाणी दिले जात नाही, असा आरोप करून ठाण्यासाठी मी स्वतः धरण आणले होते. पण, इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हव्यासामुळे ते धरण हातचे गेले आहे. आता नवरात्रीच्या आत जर पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तर आयुक्तांना त्यांच्या दालनातच बंद करून ठेवू, असा इशारा डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.