mp sanjay raut target mahayuti government over delhi visit political news
मुंबई : मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या मोर्चाला जनतेचा आणि अनेक पक्ष-संघटनांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. “फडणवीस आणि शिंदेंनी कितीही आपटाआपट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरण्याचा निर्णयाविरोधात होणाऱ्या मोर्च्यावरही भाष्य कलं आहे. “शनिवारी (ता. ५ जुलै) मराठी भाषेच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असून, या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा पाठिंबा मिळाला आहे. शरद पवार यांच्याशी माझी कालच चर्चा झाली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा पक्ष मोर्चात सहभागी होईल आणि कार्यकर्त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत,” असे राऊत म्हणाले.
काँग्रेस पक्षही हिंदी सक्तीच्या विरोधात असून, त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभागही अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, दलित पँथरसह अनेक संघटनांनीही या ऐतिहासिक मोर्चाला पाठिंबा दिला आहे. राऊत म्हणाले, “पूर्वी जे नेते एकमेकांपासून टाळाटाळ करत होते, ते आज एकत्र येत आहेत, चहा पीत आहेत, गप्पा मारताना व्हिडिओ शेअर करत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे हे या लढ्याचे नेतृत्व करत आहेत, ही जनतेसाठी समाधानाची बाब आहे.”
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरून भाजपवर हल्लाबोल
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) हे केंद्र सरकारने लादलेले धोरण असून, राज्य सरकारने ते तयार केलेले नाही, असे स्पष्ट करत राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “हा अहवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात अभ्यासासाठी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली होती. परंतु, कोणताही अंमलबजावणीचा आदेश उद्धव ठाकरे सरकारने दिला नव्हता,” असे राऊत यांनी नमूद केले.
“जर एखाद्या विषयावर समिती नेमली तर तो गुन्हा ठरतो का? जीआर काढण्याचे काम नंतरच्या सरकारचे आहे. आज फडणवीस जे आरोप करत आहेत ते निव्वळ राजकारण आहे. अहवाल तीन वर्षे गोडाऊनमध्ये पडून होता, आता आरएसएसच्या दबावामुळे पुन्हा पुढे आणण्यात आला,” असा आरोपही त्यांनी केला. “हे काही श्रीकृष्ण आयोगासारखे न्यायालयीन आदेश नसून, हे सरकारवरचा दबाव आहे. फडणवीस सरळ खोटं बोलत आहेत,” असा घणाघात करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
मराठी भाषेच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या संयुक्त मोर्चाच्या मार्ग, वेळ व नियोजनासंदर्भात अंतिम चर्चा सुरु आहे. कालच आम्ही मोर्चाची घोषणा केली. आमच्याकडील प्रमुख पदाधिकारी आणि मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मोर्चाचा मार्ग, वेळ, व्यासपीठावर कोणत्या भूमिका असाव्यात, कोणाला आमंत्रित करायचे यावर सविस्तर चर्चा झाली,” असे राऊत यांनी सांगितले.
मोर्चा कुठून सुरु करायचा यावरही पर्यायांवर विचारविनिमय झाल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. “चौपाटी येथून मोर्चा काढण्याचाही पर्याय आमच्याकडे होता. मात्र, एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय झाल्यामुळे आता दोन्ही पक्षांनी मिळून अंतिम निर्णय घेण्यासाठी चर्चा सुरू केली आहे,” असेही त्यांनी नमुद केले.