File photo ; Number Plate
चंद्रपूर : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देशही दिलेले आहेत. याअन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरिता सूचना जारी करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : राज्यातील चालक-वाहकांची वाढणार कमाई; एसटी महामंडळाची ‘ही’ योजना ठरणार फायद्याची…
चंद्रपूर जिल्ह्याकरिता एमएस एफटीए प्रायव्हेट लि. ही एजन्सी निश्चित करण्यात आली असून, एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता http : maharashtrahsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आलेले आहे. वाहनधारकांनी वरील पोर्टल बुकिंग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट बनवून घ्यावी.
वाहनधारक चंद्रपूर कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी काही कामानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात वाहन वापरत असेल तरी देखील सदर वाहनास नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरीता दुचाकी, ट्रॅक्टर करीता 450 रुपये, तीन चाकी वाहनाकरीता 500 रुपये आणि इतर सर्व वाहने 745 रुपये आकारण्यात येणार आहे.
वाहनधारकांना त्याच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास, संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दाखल करू शकतात. वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त योजना चढविणे, उतरविणे, दुय्यमप्रत, विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येईल.
तसेच एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने, आदी वाहनांवर कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.
हेदेखील वाचा : Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभेआधी केजरीवालांचा खळबळजनक दावा; म्हणाले, “येत्या काळात सिसोदियांच्या…”