‘गली गली मैं शोर है अजित पवार चोर है’ ; पुण्यात शरद पवार गटाच्या घोषणा

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे शरद पवार गटाच्या समर्थकांनी पुण्यामध्ये काळ्या फिती बंधून निषेध व्यक्त केला आहे.

    पुणे : निवडणूक आयोगाने (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत (EC Decision On NCP) अजित पवार गटाच्या (Ajit Pawar group) बाजूने निकाल दिला आहे. यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राज्यभरातून जोरदार निदर्शने केली आहेत. पुण्यामध्ये देखील निवडणूक आयोगाच्या या निकालाचे पडसाद पहायला मिळाले असून शरद पवार गटाच्या (Sharad Pawar group) समर्थकांनी पुण्यामध्ये काळ्या फिती बंधून निषेध व्यक्त केला आहे. तसेच यावेळी ‘गली गली मैं शोर है, अजित पवार चोर है’ अशा घोषणा देखील दिल्या आहेत.

    निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे. यानंतर पुण्यातील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यामध्ये अनेकत आजी व माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पुण्यामध्ये जोरदार आंदोलन केले. सर्वांनी काळ्या फिती बांधून अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘जो नाही झाला काकाचा, तो नाही होणार जनतेचा’, ‘गली गली मैं शोर है, अजित पवार चोर है’ अशा घोषणा दिल्या. त्याचबरोबर पक्ष कार्यालयातील कोनशिलेवरील अजित पवार यांचे नाव हातोडी मारुन काढून टाकण्यात आले.

    या आंदोलनावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाबाबत दिलेला निर्णय आमच्यासाठी धक्कादायक आहे. आमच्या पक्षाचं नाव व चिन्हा त्यांना दिलं असलं तरी आमच्याकडे शरद पवार आहेत. शरद पवार आमच्यासाठी पक्ष आहेत. आम्ही आता नवीन नाव आणि पक्ष चिन्हासह लवकरच समोर जाणार आहे. पण निवडणुक आयोग, तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या आदेशानुसार चालत असून ही आपल्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे” देखील प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले.