Gopichand Padalkar : अध्यक्ष निवडीवेळी नवरदेव होणारे, आता चीनला पळाले! गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला, सौजन्य : सोशल मीडिया
Gopichand Padalkar : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार राजकीय निशाणा साधला. अध्यक्ष निवडीच्या वेळी नवरदेवाप्रमाणे उपस्थित राहणारे जयंत पाटील आता चीनला पळाले आहेत, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली.
जिल्हा बँकेतील एकहाती कारभाराला आता भाजप आव्हान देणार असून, शेतकऱ्यांच्या हिताविरोधात कोणताही निर्णय झाल्यास ठाम विरोध केला जाईल, असा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला.
जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पडळकर म्हणाले, महेंद्र लाड चांगल्या पद्धतीने बँकेचा कारभार चालवतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, मागील काळाप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कारभार झाल्यास भाजप गप्प बसणार नाही. बँकेतील सत्तेचे केंद्रीकरण चुकीचे असून, जयंत पाटील यांच्या एकहाती कारभाराला आता काँग्रेसही आव्हान देत आहे. यामध्ये भाजपची भूमिका महत्त्वाची आहे.
जयंत पाटील यांच्या भूमिकेवर टीका करताना पडळकर म्हणाले, निवडणुका घ्यायची वेळ आली की, दुष्काळाचे कारण पुढे करायचे आणि अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीची वेळ आली की, चर्चेलाच बगल द्यायची, हा दुटप्पी कारभार सर्वांनी पाहिला आहे. जयंत पाटील यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. बँकेचा कारभार यापुढे ठरावीक लोकांच्या हातात केंद्रित राहणार नाही.
बँकेच्या माध्यमातून कारखानदारांना विविध प्रकारची कर्जे मिळतात; मात्र तरुणांना व्यवसाय आणि रोजगारासाठी वैयक्तिक लाभाची कर्जे मिळाली पाहिजेत. युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली.
ते पुढे म्हणाले, संचालक झाल्यामुळे बँकेच्या कारभाराची अधिकची कागदपत्रे मिळवणे आता सोपे होणार आहे. मी स्वतः कोणतेही बँकेचे कर्ज घेणार नाही. माझी भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल. बँकेचा कारभार चांगला चालविण्यासाठी सहकार्य करू; मात्र शेतकरीहिताला बाधा आणणाऱ्या निर्णयांना विरोधही करू. प्रस्थापितांच्या हातातून विस्थापितांच्या हातात कारभार येणे, हे भाजपचे यश असल्याचा दावाही त्यांनी केला.
Ans: अध्यक्ष निवडीवेळी नवरदेवाप्रमाणे उपस्थित राहणारे जयंत पाटील आता चीनला पळाले आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.
Ans: बँकेतील एकहाती कारभाराला भाजप आव्हान देणार असून चुकीच्या पद्धतीने कारभार झाल्यास पक्ष गप्प बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Ans: महेंद्र लाड यांनी चांगल्या पद्धतीने बँकेचा कारभार चालवावा, अशी अपेक्षा पडळकर यांनी व्यक्त केली.






