लासलगाव : छत्रपती संभाजीनगर इथून शेतकऱ्यांचा कांदा तेलंगणा राज्यातील (Telangana State) हैदराबाद येथे पाठवला असता 1900 ते 2000 रुपये इतका बाजार भाव (Onion Rate) मिळतो. येथे तोच कांदा येथे 900 ते एक हजार रुपयांनी घेतला जात आहे. आता औरंगाबादनंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि विंचूर येथील कांदा हैदराबाद बाजार समितीत विक्रीसाठी नेण्याची व्यवस्था पुढील आठवड्यातील बुधवार, गुरुवारनंतर केली आहे, अशी माहिती बीएसआर पक्षाचे महाराष्ट्रातील समन्वयक हर्षवर्धन जाधव (Harshwardhan Jadhav) यांनी दिली.
महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीला नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंचूर येथे त्यांनी भेट दिली. लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार विंचूर येथे कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांनी थेट कांदा लिलाव बंद पाडून आपला संताप व्यक्त केला. तसेच शासन काहीच करत नसल्याचा आरोप केला.
कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही
तेलंगणा राज्यातील हैदराबाद ही विंचूरप्रमाणे बाजार समिती आहे. तेथे आम्ही कांदा खरेदी करत नसून विक्रीसाठी शेतकऱ्यांना सहकार्य करतो. राज्यकर्त्यांनी काही चुकीचे होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यामुळे तेथे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. येथील राज्य सरकारने लक्ष दिले पाहिजे ही भूमिका होती पण राज्य सरकार काही करत नसल्याने येथे कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.