शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी (फोटो सौजन्य- ChatGPT)
Palghar News: पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या अतिदुर्गम भागात 108 रुग्णवाहिका सेवा एका 60 वर्षीय आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी ठरली. शेतात गवत कापत असताना विषारी सापाने दंश केल्यानंतर गंभीर झालेल्या नर्मदा महादू महाले यांच्यावर रुग्णवाहिकेतच वेळीच उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर विविध रुग्णालयांत उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना घरी सोडण्यात आले.
मोखाडा तालुक्यातील बेरिस्ते ग्रामपंचायत हद्दीतील पासोडीपाडा येथे 9 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. नर्मदा महाले या शेतात गवत कापत असताना त्यांना विषारी सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने आसे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यावेळी आसे येथील 108 रुग्णवाहिका दुसऱ्या एका गंभीर रुग्णाला घेऊन गेल्यामुळे उपलब्ध नव्हती. त्यामुळे मोखाडा येथील 108 रुग्णवाहिकेला तातडीने पाचारण करण्यात आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून 108 रुग्णवाहिकेचे डॉ. पंजाबराव चव्हाण यांनी तातडीने आसे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. नर्मदा महाले यांची प्रकृती पाहिल्यानंतर त्यांना रुग्णवाहिकेत हलविण्यात आले. पुढील रुग्णालयात पोहोचेपर्यंत वेळ वाया जाऊ नये म्हणून प्रवासादरम्यानच आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू ठेवण्यात आले.
त्यानंतर नर्मदा महाले यांना मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. निरंजन सापटे यांनी त्यांच्यावर पुढील उपचार केले. दोन दिवस उपचार केल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे तीन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले.
मोखाड्यासारख्या दुर्गम आणि आदिवासीबहुल भागात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या घटनेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यापासून प्रवासादरम्यान उपचार सुरू ठेवण्यापर्यंत वैद्यकीय पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे नर्मदा महाले यांना वेळेत पुढील उपचार मिळू शकले. नर्मदा महाले यांचा मुलगा मधुकर महाले यांनी 108 रुग्णवाहिका सेवा, डॉ. पंजाबराव चव्हाण आणि उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे आभार मानले आहेत.
Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू






