
सरावलीतील गो ग्रीन इको टेक कंपनीवर कठोर कारवाई करा
सरावली येथील गो ग्रीन इकोटेक सोल्युशन कंपनीकडून नियमबाह्यपणे घातक रासायनिक घनकचऱ्याची प्रक्रिया केली जात असल्याचा आरोप आहे. कंपनीने जिल्हा प्राधिकरणाची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत इमारत उभारल्याचेही समोर आले आहे. पुनरप्रक्रिया केलेल्या रासायनिक घनकचऱ्याची बेकायदा विल्हेवाट लावण्याचे प्रकार घडत असून यामुळे परिसरातील नागरिकांना असह्य दुर्गंधी, वायुप्रदूषण, दूषित पाणी अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आमदार निकोले यांनी केला आहे. अखेर या संपूर्ण प्रकरणात त्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना दाखल केली असून, कंपनीविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यासोबतच कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर येथील उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही आमदार निकोले यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व मुख्य सचिवांना प्रत्यक्ष भेटून केली. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याआधी सरावली लिमिटेड येथील गो ग्रीन इको टेक सोल्युशन प्रा. लि. या उद्योगाने केंद्रीय पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले नसल्याचे तपासात उघड झाल्यानंतर, प्रादेशिक अधिकारी किरण हसबनिस यांनी १७ ऑक्टोबर रोजी उपजीविका उद्योगाला नोटीस बजावली. संमती नियमांचे उल्लंघन, धोकादायक कचऱ्याच्या प्रक्रियेत अनियमितता, अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव आणि कचरा पुनर्प्रक्रिया प्रणालीत आवश्यक सुधारणा न केल्याबद्दल मंडळाने गंभीर आक्षेप घेतले आहेत. ३१ सप्टेंबर २०२३ रोजी उद्योगाने केलेल्या करारातील अनेक तरतुदींचे पालन केले जात नसल्याचे तपासात उघड झाले आहे.