वाढवण बंदरविरोधात रणशिंग! ( सौजन्य - सोशल मीडिया )
वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि सहयोगी संघटनांच्या वतीने वरोर-चिंचणी मार्गालगत शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सेवा रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा वळवला. ‘जल-जंगल-जमीन आमचा अधिकार’, ‘आमच्या गावात, आमचं सरकार’, ‘एकाच जिद्द वाढवण बंदर रद्द’, ‘जितेंगे, लढेंगे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सेवा रस्त्याच्या ५०० मीटर परिसरात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशासह ओव्हरलोड वाहनांची वाहतूक आणि रस्त्याच्या कामातील नियमभंगाचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. सेवा रस्त्यासाठी आणलेले दगड हाताने बाजूला करत आंदोलकांनी गांधीवादी पद्धतीने सविनय कायदेभंग केला.
आंदोलनाला पाठिंबा देताना आमदार विनोद निकोले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. स्थानिकांचा वाढवण बंदराला विरोध असताना आंदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महात्मा गांधी यांच्या विचारांवर आधारित सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून दडपशाहीविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार जनतेला असल्याचे निकोले यांनी सांगितले. भूमिपुत्रांना विनाशकारी बंदर नको, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सुमारे ५० पोलीस अधिकारी आणि ४५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते, भर उन्हात मच्छीमार, शेतकरी, बागायतदार, डायमेकर्स, भूमिपुत्र तसेच महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.
यावेळी वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष विनीत पाटील, मानवेंद्र आरेकर, वाढवण बंदर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख गिरीश राऊत, काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष कॅप्टन सत्यम ठाकूर, नॅशनल फिश वर्क फोरमचे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयवंत तांडेल, कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्यासह विविध आदिवासी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. गांधी जयंतीच्या दिवशी झालेल्या या आंदोलनातून वाढवण बंदर रद्द करण्याची मागणी पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आली.
…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित






