
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Pandharpur Corridor: पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या नगरीतील शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा आता नव्या रूपात जपला जाणार आहे. प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉरच्या आराखड्यात शहरातील ९ पुरातन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनासाठी तब्बल ३६ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे हा कॉरिडॉर केवळ भाविकांच्या सुविधांचा प्रकल्प न राहता पंढरीचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.
या आराखड्यात श्रीराम मंदिर-होळकर वाडा आणि द्वारकाधीश मंदिर-शिंदे वाडा या दोन ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रत्येकी १२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. म्हणजेच या दोन्ही वास्तूंसाठी मिळून तब्बल २४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय मल्लिकार्जुन मंदिर आणि ताकपिठे विठोबा मंदिरासाठी प्रत्येकी २ कोटी रुपये, प्रल्हाद महाराज समाधीसाठी ५० लाख रुपये, देहूकर महाराज मठासाठी १ कोटी ५० लाख रुपये, अकरारुद्र मारुती मंदिरासाठी १ कोटी रुपये, गोपाळकृष्ण मंदिरासाठी ३ कोटी रुपये आणि जैन मंदिरासाठी २ कोटी रुपये प्रस्तावित आहेत.
| पुरातन वास्तू | प्रस्तावित निधी |
|---|---|
| श्रीराम मंदिर, होळकर वाडा | १२ कोटी |
| द्वारकाधीश मंदिर, शिंदे वाडा | १२ कोटी |
| मल्लिकार्जुन मंदिर | २ कोटी |
| ताकपिठे विठोबा मंदिर | २ कोटी |
| प्रल्हाद महाराज समाधी | ५० लाख |
| देहूकर महाराज मठ | १.५० कोटी |
| अकरारुद्र मारुती मंदिर | १ कोटी |
| गोपाळकृष्ण मंदिर | ३ कोटी |
| जैन मंदिर | २ कोटी |
| एकूण | ३६ कोटी |
घाट परिसरातील होळकर आणि शिंदे वाडे हे पंढरीच्या इतिहासाचे महत्त्वाचे साक्षीदार मानले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात उभारलेल्या होळकर वाड्यात सुमारे १२५ लाकडी खण असल्याची माहिती आहे. या वास्तूचे बांधकाम १७५४ मध्ये सुरू होऊन १७६७ मध्ये पूर्ण झाल्याचे सांगितले जाते.
शिंदे वाड्यातील द्वारकाधीश मंदिर, २४ खांबांचा सभामंडप आणि दगडी वास्तुरचना यामुळे या वास्तूलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे प्रस्तावित संवर्धनाच्या माध्यमातून या वास्तूंचा ऐतिहासिक ठेवा जपण्यास मदत होणार आहे.
पंढरीचा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा जपणार
शाकंभरी मंदिर, काळभैरव मंदिर, शनि मंदिर, सीमेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर आणि एकवीरा मंदिर यांचा यापूर्वीच्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रस्तावित ३६ कोटी रुपयांच्या निधीत या मंदिरांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नाही.
धार्मिक पर्यटनाला ऐतिहासिक पर्यटनाची जोड
पंढरपूर हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आता पुरातन मंदिरांसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन झाल्यास पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला ऐतिहासिक पर्यटनाची जोड मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांसोबतच इतिहास आणि वास्तुकलेमध्ये रस असलेल्या पर्यटकांसाठीही पंढरपूरचे आकर्षण वाढू शकते.
प्रस्तावित कॉरिडॉरच्या माध्यमातून भाविकांच्या सुविधांसोबतच पंढरीचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यावर भर दिला जात असल्याने या प्रकल्पाकडे आता केवळ धार्मिक सुविधांच्या दृष्टीने नव्हे, तर वारसा संवर्धनाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.