
Pandharpur Mandir, Vitthal Darshan
Vitthal Rukmini Mandir Darshan: श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांच्या मूर्तींच्या दीर्घकालीन जतन, संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेला दिवाणी न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशाविरोधात संबंधित वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. या अपीलवरील सुनावणी आज (23 जून) पार पडली. सुनावणी वेळी मंदिर 23 व 24 जून रोजी भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमाता यांच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन, संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI), राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विशेष संवर्धन प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासंदर्भात सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुरातत्त्व तज्ज्ञ, संबंधित अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, सल्लागार परिषद सदस्य आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
तज्ज्ञांनी दिलेल्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार 22 ते 24 जून या कालावधीत मूर्ती संवर्धनाचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रक्रियेदरम्यान आवश्यक तांत्रिक कामे सुरक्षित व सुरळीतपणे पूर्ण करता यावीत, यासाठी 23 आणि 24 जून रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याची सूचना यापूर्वी देण्यात आली होती.
मात्र, या संवर्धन प्रक्रियेविरोधात पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यावर सुनावणी करताना न्यायालयाने अंतरिम स्थगिती आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखत प्रस्तावित संवर्धन प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
Vidarbha Monsoon: विदर्भात अखेर मान्सूनची एंट्री; पण शेतकऱ्यांना हवामान विभागाचा महत्त्वाचा सल्ला
दरम्यान, या स्थगिती आदेशाविरोधात संबंधित वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून, 23 जून रोजी होणाऱ्या सुनावणीनंतर वरिष्ठ न्यायालयाकडून मिळणाऱ्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे सध्या 23 व 24 जून रोजी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले राहणार असून, दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू राहणार आहे. वारकरी, भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.