Vidarbha Monsoon : विदर्भात अखेर मान्सूनची एंट्री; शेतकऱ्यांना पेरणीबाबत हवामान विभागाचा मोठा इशारा
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, यावर्षी विदर्भात मान्सून साधारण दहा दिवस उशिराने दाखल झाला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत नागपूर, भंडारा, गोंदिया तसेच उर्वरित विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान विदर्भात मान्सून दाखल झाला असला तरी सुरुवातीच्या टप्प्यात पावसात काही दिवसांचा खंड पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. २८ जूननंतर दुसऱ्या टप्प्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये किमान ७० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असा सल्ला दिला आहे. अपुऱ्या पावसात पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते, त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असही त्यांनी म्हटल आहे.
दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात वातावरण आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने नाशिकसाठी यलो अलर्ट जारी केला असून घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मोठा भाग मान्सूनला सुरुवात झाली आहे. पुढील सहा ते सात दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता असून, पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पेरणीबाबत संयम बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पुढील काही दिवसांतील पावसाची सातत्यपूर्ण स्थिती खरीप हंगामासाठी निर्णायक ठरणार आहे.






