
'पनीर'बद्दल राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक
पनीरमधील वाढत्या भेसळीची गंभीर दखल घेत तसेच लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने, मंत्री झिरवाळ यांनी पनीरच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीजन्य फॅट्सपासून बनवलेल्या ‘ॲनालॉग’वर कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्याच्या या निर्णयाला केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही पाठिंबा मिळाला असून तसे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
बारामतीत मतदान घटले, बालेकिल्ल्यात गटबाजीचा फटका, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज
अनेक हॉटेल्समध्ये पनीरऐवजी स्वस्त पर्यायांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याने तक्रार करण्यात आली होती. मात्र, नव्या नियमानुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटना त्यांच्या मेन्युकार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेवर पदार्थात ‘नैसर्गिक पनीर/चीज’ वापरले आहे की ‘चीज ॲनालॉग’, हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. खाद्यपदार्थ विक्रेते किंवा हॉटेल चालक पनीर म्हणून चीज ॲनालॉगची विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.
मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे की, अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नुसार ग्राहकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. जे हॉटेल मालक पारदर्शकता पाळणार नाहीत आणि माहिती लपवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळतील, त्यांचा परवाना कायमचा रद्द केला जाऊ शकतो. नागरिकांच्या जेवणातील आवडीचा पदार्थ असलेल्या पनीरमध्ये होणारी भेसळ ही चिंतेची बाब आहे. ग्राहकांना आपण काय खातोय हे कळायलाच हवे. यापुढे पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉग विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
· चीज ॲनालॉगच्या पुरवठादारांना विक्री बिलावर त्याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.
· हॉटेल संघटनांशी चर्चा करून सर्व विभागीय अन्न सहआयुक्तांना याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
· रेस्टॉरंट आणि केटरर्सना बल्क मेसेजद्वारे या नव्या नियमांची माहिती दिली जात आहे.
अन्न सुरक्षा मानके विनियम 2011 नुसार पनीर हा केवळ दुधापासून तयार केलेला पदार्थ आहे. तर डेअरी ॲनालॉग हा दूधाव्यतिरिक्त खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून तयार केला जातो. तो दिसायला पनीरसारखा असला, तरी पनीर नसून ‘चीज ॲनालॉग’ या प्रवर्गात मोडतो. हॉटेल्स, उपाहारगृहे आणि जलद खाद्यपदार्थ विक्रेते मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.
उत्पादन घेताना ग्राहकांनी दक्षता घ्यावी. दिशाभूल झाल्यास प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.