सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती/अमोल तोरणे : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अपेक्षेनुसार मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचे स्पष्ट आहे. मात्र घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतनाची गरज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या निवडणुकीत खासदार पार्थ पवार, जय पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार मोहीम राबवली. गावागावांत सभा, संपर्क दौरे आणि संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवण्यात आल्या. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीही पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, मात्र प्रत्यक्ष आकडेवारीने वेगळे चित्र स्पष्ट केले. एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदारांपैकी फक्त २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. म्हणजेच केवळ ५८.१७ टक्के मतदान नोंदवले गेले. मागील विधानसभा निवडणुकीत ७१.५७ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी २ लाख ७१ हजार २७९ मतदारांनी सहभाग घेतला होता. या तुलनेत सुमारे १३ टक्क्यांची घसरण झाल्याने राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घसरणीमागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
तीव्रता अन् समन्वयाचा अभाव
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची सुसूत्र आणि प्रभावी यंत्रणा उभी राहिली होती. प्रत्येक गाव आणि प्रभागात त्यांचा थेट संपर्क आणि नियंत्रण असल्याने कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि जबाबदारीची जाणीव होती. मात्र या पोटनिवडणुकीत तीच तीव्रता आणि समन्वय दिसून आला नाही. राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार स्वतः बारामती शहरासह तालुक्यातील प्रत्येक गाव वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रचार सभा घेत होते. खासदार पार्थ पवार राष्ट्रवादीच्या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवून पदाधिकाऱ्यांना तशा सूचना देत होते. या निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्यासह शर्मिला पवार व इतर सदस्य उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी सक्रिय झाले होते.
आगामी काळात गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान
राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केले असले तरी काहींनी अपेक्षित तितकी मेहनत घेतली नसल्याचेही स्पष्टपणे जाणवले. याशिवाय तीव्र उन्हाळा, मतदारांमध्ये निर्माण झालेली भावनिक पोकळी आणि तुल्यबळ विरोधकांचा अभाव यामुळेही मतदानाचा उत्साह कमी झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी हे देखील मतदान घटनेचे महत्त्वाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात ही गटबाजी रोखण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे असल्याचे चित्र या घटलेल्या टक्केवारीवरून दिसत आहे.






