सिंधुदुर्गाच्या विकासाचा पैसा राजकोटला लावला, परशुराम उपरकर यांची टीका
भगवान लोके , कणकवली : नौसेना दिनाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. नौसेना दिनासाठी एकूण १३ कोटी ५० लाख खर्च झाला . तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळा कोसळण्याची घटना घडली. या प्रकरणात पुतळ्याचे शिल्पकार आपटेचे म्हणणे पोलीसांनी जबाबात नोंदवले नाही . एवढा मोठा खर्च करुन महाराष्ट्रात , देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव खराब झाले , त्याला कारणीभुत बांधकाम विभाग आहे. सिंधुदुर्गाच्या विकासाचा पैसा राजकोटला लावला असल्याची टीका माजी आ. परशुराम उपरकर यांनी केली.
कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात ते बोलत होते ते म्हणाले , राजकोट किल्ला सुशोभिकरण आणि नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी दौ-यावर आले. सव्वा दोन कोटी रुपये खर्च करुन 3 हेलिपॅड उभारण्यात आले. रस्ते आणि राजकोट किल्ला सुशोभीकरण साठी 3 कोटी खर्च बांधकाम विभागाने केला. आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी एकूण 2 कोटी 50 लाख खर्च केला.याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी 21 नोव्हेंबर 23 रोजी 5 कोटी 54 लाख हेलिकॉप्टर इंधन साठी 37 लाख, मान्यवर व्यवस्था निवास भोजन 25 लाख, मंडप व्यवस्था 2 कोटी, बॅरिकेट दीड कोटी, इंटरनेट पाणीपुरवठा व अन्य खर्च 18 लाख 50 हजार, जिल्ह्याबाहेरून आलेल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 5 कोटी 54 लाख ची मागणी केली.या मागणीला 4 डिसेंबर 2023 रोजी मान्यता अप्पर सचिव नियोजन महाराष्ट्र राज्य यांनी दिली.म्हणजेच खर्च मान्यतेपुर्वी खर्च केला गेला. असा आरोप उपरकर यांनी केला.
काही अधिकाऱ्यांनी निवास भोजन व्यवस्था पसंत न पडल्याने स्वखर्चाने स्वतःची व्यवस्था केली होती. थोडक्यात नौसेना दिनी वायफळ खर्च बांधकाम विभागाने केला आहे. राज्य सरकार ने नौसेना दिनासाठी एकूण 13 कोटी 50 लाख खर्च केला. हा खर्च नौसेनेने करणे अपेक्षित होते. मात्र एवढा मोठा खर्च करून राज्य सरकारने मालवण चे नाव मोठे न करता बदनाम केले. जिल्हा विकासासाठी होणारा खर्च असा वायफळ घालवल्यामुळे जनतेने याचा विचार करणे गरजेचे आहे.नौसेना दिन कार्यक्रम नियोजनामुळे पर्यटकानी मालवनकडे पाठ फिरवली. प्रशासनाने सक्तीने या काळात मच्छीमारी बंद करायला लावली होती. नौसेना दीना नंतर सुद्धा मालवण मध्ये मासेमारी कमी झाली.
दुसरीकडे शिवाजी महाराजांचा निकृष्ट पुतळा उभारून मालवण चे नाव अवघ्या देशात बदनाम केले आहे. अनिकेत पटवर्धन नेच शिवपुतळ्याचे काम जयदीप आपटे ला दिले होते. जयदीप आपटे ला या पुतळ्या कामी 2 कोटी 44 लाखपैकी केवळ 26 लाख दिले गेल्याचे आपटे याने पोलिसांना जबाबावेळी सांगितले असून आपटे चे हे म्हणणे रेकॉर्डवर घेतले नसल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. नौसेना दिन, राजकोट किल्ला सुशोभीकरण कामांत भ्रष्टाचार झालेला असून त्याला अनिकेत पटवर्धन याचेच पाठबळ आहे. यापुढेही अनिकेत पटवर्धन याने कोणालाही पत्रकार परिषद घ्यायला सांगितले तरी त्याला चोख उत्तर देणार आहे. असे उपरकर म्हणाले.