
RPF Jawan Saves Passengers Lives at Parbhani Railway Station marathi news
Parbhani News : परभणी : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी ऑपरेशन जीवन रक्षा आणि ऑपरेशन अमानत अंतर्गत तत्पर व उल्लेखनीय कार्य करत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. परभणी रेल्वे स्थानकावर (Railway News) आरपीएफ जवानाने एका प्रवाशाचा जीव वाचवला असून दुसऱ्या घटनेत सेलू येथे हरवलेली पर्स प्रवाशाला परत करण्यात आली.
दिनांक ५ एप्रिल डीजी हेड कॉन्स्टेबल पद्माकर मोगरे हे परभणी रेल्वे स्थानकावर गुन्हे प्रतिबंधक कर्तव्य बजावत असताना गाडी क्रमांक २२७८८ नागरसोल-नरसापूर एक्सप्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली होती. यावेळी जनरल डब्यात प्रवासी चढत असताना एक प्रवासी अचानक घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक फटीत अडकला. ही घटना लक्षात येताच मोगरे यांनी अत्यंत तत्परता व धाडस दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्च्या वेळेवर केलेल्या कार्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला आणि संभाव्य दुर्घटना टळली. सदर प्रवासी शेख मोहम्मद असे असून ते परभणी ते नांदेड असा प्रवास करत होते.
हे देखील वाचा : ऑनलाइन टास्कच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक; मोबाईलवर मेसेज पाठविला अन्…
सेलू येथे हरवलेली पर्स प्रवाशाला परत…
दुसऱ्या घटनेत, अविषा (राहणार पुणे) ही महिला आपल्या पतीसोचत गाडी क्रमांक १७६२९ हडपसर एक्सप्रेसने पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत होत्या. छत्रपती संभाजीनगर येथे उतरताना त्यांनी चुकून आपली पर्स गाडीतच विसरली. पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक १३९ वर तक्रार नोंदवली. मिळालेल्या संदेशानुसार हेड कॉन्स्टेबल शिवानंद मांत यांनी सेलू रेल्वे स्थानकावर संबंधित डब्याची तपासणी केली आणि पर्स शोधून काढली. त्यानंतर प्रवाशाशी संपर्क साधून त्यांना आर पी एफ चौकी, सेलू येथे बोलावण्यात आले आणि पर्स सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आली.
सदर पर्समध्ये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, अॅक्सिस बँकेचे डेबिट कार्ड आणि एच डी एफ सी बँकेची कार्डे होती. या दोन्ही घटनांमधून आरपीएफ कर्मचाऱ्यांची तत्परता, सतर्कता आणि प्रवाशांप्रती असलेली मानवी भावना अधोरेखित होते. दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग या आर पी एफ कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करीत असून प्रवाशांना सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासी अनुकूल रेल्वे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा : नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात
११ पदांसाठी २१९ उमेदवारांनी दिली परीक्षा
पोलीस दलाची चालक पोलिस शिपाई पदासाठी लेखी परीक्षा रविवारी (दि.५) – पार पडली. सदर परीक्षेला एकूण २४२ पैकी २१९ उमेदवार उपस्थित होते, यात २०७ पुरुष व १२ महिला उमेदवार होते. ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी या ठिकाणी ही परीक्षा पार पडली. एकूण ११ – पदांसाठी ही पोलीस भरती घेण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक समाधान पाटील दीपक वाघमारे, पोलिस निरीक्षक महेश लांडगे, विवेकानंद पाटील, गणेश कदम, दीपक बोरसे, रामेश्वर सोळंके विश्वजित कासले मुंजाजी दळवे, गजानन मोरे, रामेश्वर धोंडगे, पोलिस उपनिरीक्षक आदित्य लाकुळे, अशोक कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी रेड्डी, संतोष वाव्हळ, गणेश कौटकर, अरुण पांचाळ आदींनी ही परीक्षा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.