नांदेडमधील साई लाला गँग आणि सदा गँग मध्ये गॅंगवॉर सुरु झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Crime News : नांदेड : शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या गॅंगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात दाखल करत असताना एका मयताच्या भावाने चाकूने वार करून एकाला संपविले. नांदेडमधील साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये हे टोळीयुद्ध सुरु झाले. दोन्ही गँगमधील मयत आणि साथीदार हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर हद्दपारी, एमपीडीए अंतर्गतही गुन्हे (Crime News) दाखल आहेत.
अलिकडच्या काळात शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून पुन्हा एकदा गँगवॉरचे सावट गडद झाले आहे. दोन-तीन दिवसांत घडलेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील विविध भागांत लहान-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे या शैक्षणिक वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, शहराची ओळखच बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल पोस्ट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू
याशिवाय, गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत संघर्ष आणि वर्चस्वासाठी सुरू असलेली चढाओढ ही परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहे. काही टोळ्यांमध्ये जुने वैमनस्य, आर्थिक व्यवहार आणि स्थानिक वर्चस्व या कारणांमुळे उफाळून येणारे संघर्ष थेट हिंसाचारात परिवर्तित होत आहेत. परिणामी, संवेदनशील भागांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत असून, सामान्य नागरिक यामध्ये बळी पडण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
गुन्हेगारांवर कठोर कारवाई, सतत गस्त, तसेच संशयितांवर नजर ठेवणे यासाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर, युवकांना सकारात्मक दिशादर्शन, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक प्रबोधन यावरही भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकूणच, नांदेडमध्ये वाढती गुन्हेगारी आणि गँगवॉरचे वातावरण शहराच्या सामाजिक आणि शैक्षणिक आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून, प्रशासन आणि समाज या दोघांनीही एकत्रितपणे या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा : शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन
गोदावरीत टिप्पर पलटला; क्लीनर झाला ठार
मुदखेड तालुक्यातील गोदावरी नदीच्या पुलावरून नदीपात्रात आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून अवैध वाळू वाहतूक करत असलेला टिप्पर अचानक पलटल्याने गाडीचा क्लिनर जागीच ठार झाला असून चालक मात्र थोडक्यात बचावला असल्याची घटना महाटी शिवारात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टिप्पर हा अवैध वाळूची भरधाव वेगात वाळूची वाहतूक करताना तोल जाऊन गोदावरी नदीत पलटला असून अपघात इतका भीषण होता की, टिप्परचा क्लिनर सुभाष मोरे वय ५० रा. नांदेड यांचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला, तर चालकाने प्रसंगावधान राखत जीव वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. मुदखेड ग्रीन झोन पट्टधात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून जिल्हा प्रशासनाकडून या प्रकाराकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवैध वाळू वाहतुकीमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, तीन निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. मुदखेड परिसरात होणाऱ्या अवैध वाहतुकीवर जिल्हाप्प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक थांबवावी, अशी मागणी केली आहे.






