
प्रवाशांना उन्हाचा चटका! पावसाळ्यातही होणार हाल; प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे लोकल फलाटांवरील शेड अधांतरी
मुंबईच्या उपनगरी रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म शेडची कामे अक्षरशः अर्धवट अवस्थेत टांगणीला लागली असून, प्रवाशांच्या डोक्यावरचे सावलीचे छत्रच हिरावून घेतल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ऐन कडक उन्हाळ्यात प्रवाशांना तळपत्या उन्हात उभे राहण्याची वेळ आली आहे. येथील शेड उभारण्याचे काम धीम्या गतीने सुरू असून, गती अशीच राहिली, तर ऐन पावसाळ्यातही प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य खासदार संजय दिना पाटील यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.(फोटो सौजन्य – AI)
मुंबईतील अनेक स्थानकांवर जुनी, जीर्ण झालेली शेड काढून टाकण्यात आली. मात्र त्याजागी नवीन शेड उभारण्याची तसदी अद्याप घेतलेली नसल्याचे दिसून येते आहे.रेल्वे विभागाची कामे इतक्या संथ गतीने सुरू आहेत की, काम चालू आहे, हा फलकच जणू कायमस्वरूपी लावून ठेवला आहे का, असा प्रश्न प्रवाशांमध्ये निर्माण निर्माण झाला आहे, भांडुप, घाटकोपर स्थानक है याचे जिवंत उदाहरण ठरले आहे. येथे प्लॅटफॉर्मवरील शेड काढून टाकली आहे तर प्लॅटफार्मवर पत्र्यांनी जागा अडवण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांसाठी उपलब्ध जागा अधिकच कमी झाली आहे. गर्दीच्या वेळी प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने उन्हात थांबावे लागते. अशा स्थितीत आजारी तसेच वयोवृध्द व्यक्तींना उष्माघाताचा त्रास होण्याचा धोका अधिक असतो. अशा घटना काही ठिकाणी घडल्या आहेत.
पावसाळा तोंडावर असताना, हीच परिस्थिती कायम राहिली तर प्रवाशांना आणखी गंभीर संकटांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गर्दीच्या वेळी पाय घसरून होणाऱ्या अपघातांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवरील शेड व इतर कामे तात्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, प्रवाशांच्या सोयीसुविधा की फक्त कागदोपत्री आहे का? असा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर विचारत आहेत.
सुविधाकडे असे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. उपनगरीय रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अशा महत्त्वाच्या व्यवस्थेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड करणारे आहे, अशी माहिती खा. संजय दिना पाटील, केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य यांनी दिली आहे.
गेल्या वर्षभरापासून ही परिस्थिती कायम असताना, प्रशासन मात्र ‘कागदोपत्री विकास’ दाखवण्यात व्यस्त असल्याची टीका होत आहे. खा. संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही आपली नाराजी व्यक्त केली आहे.