Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीने घेतले टोकाचे पाऊल
८ जुलै रोजी मोशी कचरा डेपोमध्ये कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये सोनाली गायकवाड यांचे पती नागेश गायकवाड यांचाही मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर सोनाली मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात होते.
बुधवारी रात्री सोनाली यांनी राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांच्या दोन मुली दुसऱ्या खोलीत होत्या. मुली रडत असल्याचे लक्षात आल्यानंतर सोनाली यांचे दीर त्यांना पाहण्यासाठी गेले. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता सोनाली यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले,पण उपचारापुर्वीच त्यांन मृत घोषित करण्यात आले. वायसीएम रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.
या घटनेची भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केल्याची माहिती आहे. सोनाली यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, पतीच्या निधनानंतर त्या मानसिक तणावात होत्या. सोनाली यांच्या पश्चात दोन मुली आहेत. मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर अवघ्या महिनाभरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली बुधवारी सायंकाळी घरी एकट्याच होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य घरी परतल्यानंतर त्यांनी सोनाली यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर दरवाजा तोडून पाहिल्यानंतर सोनाली लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार असून, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.



