पीएम किसानचा २३ वा हप्ता वितरित; महाराष्ट्रातील ९०.८५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ८१७ कोटी जमा
मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत २३ वा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून या हप्त्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील ९०.८५ लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने सुमारे ₹१,८१७ कोटी जमा झाल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी होताना कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की, खरीप हंगामाच्या तोंडावर मिळालेली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे. शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी या निधीचा मोठा उपयोग होणार आहे.
केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना निश्चित आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० ची मदत तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ९० लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होत असून २३ व्या हप्त्याची रक्कम वेळेत वितरित झाल्याने खरीप हंगामासाठी आर्थिक बळ मिळाले आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना आतापर्यंतच्या २२ हप्त्यांमधून सुमारे ₹४१,०८३ कोटींची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. यंदाच्या २३ व्या हप्त्यासाठी भूमी अभिलेख अद्ययावत असणे, आधारशी संलग्न बँक खाते आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक होते. तसेच लाभार्थ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक करण्यात आले होते.
केंद्र सरकारने २० जून हा दिवस ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महाराष्ट्रात कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा आणि तालुका कृषी कार्यालये, ग्रामपंचायती, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी उत्पादक संघटना आणि सहकारी संस्थांमध्ये कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
पीएम किसान योजनेचा सर्वाधिक लाभ घेणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर अव्वल स्थानावर आहे. या जिल्ह्यात ५.४५ लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थी असून त्यांना सुमारे ₹१०९.३२ कोटींचा लाभ मिळाला आहे.
त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ४.९४ लाख लाभार्थींना ₹९८.८९ कोटी, कोल्हापूर जिल्ह्यात ४.६० लाख लाभार्थींना ₹९२.१९ कोटी, सातारा जिल्ह्यात ४.३६ लाख लाभार्थींना ₹८७.२२ कोटी, पुणे जिल्ह्यात ४.३० लाख लाभार्थींना ₹८६.१० कोटी आणि नाशिक जिल्ह्यात ४.२६ लाख लाभार्थींना ₹८५.३४ कोटींचा लाभ मिळाला आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वितरित झालेला पीएम किसानचा २३ वा हप्ता राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा ठरत असून शेतीच्या तयारीला गती मिळण्यास मदत होणार आहे.






